पानाच्या दुकानात जगभरातील घंटांचा संग्रह | पुढारी

पानाच्या दुकानात जगभरातील घंटांचा संग्रह

मुंबई : भारतीय संस्कृतीत खाऊचे पान, विडा यांना वेगळेच महत्त्व आहे. केवळ स्वाद किंवा मुखशुद्धी म्हणून नव्हे तर त्याला एक सांस्कृतिक महत्त्वही आहे. राज्यात पानाच्या टपर्‍या, पानमंदिरे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईतील बोरिवलीच्या घंटावाला पानमंदिरात केवळ पानच मिळते असे नाही; तर तिथे तब्ब्ल 250 देशांमधल्या 364 पेक्षा जास्त घंटांचा संग्रहही पाहायला मिळतो. पान तयार झाल्यावर घंटा वाजवून ग्राहकाला पान देण्यात येते. विशेष म्हणजे या घंटा या नेहमी विदेशात जाणार्‍या ग्राहकांनी आणून दिल्या आहेत.

येथील नेहमीचे ग्राहक विदेशात गेल्यानंतर आपल्या लाडक्या घंटावाला पानमंदिरासाठी घंटा आणतात. यापूर्वी दुकानात घंटा टांगलेल्या होत्या. मात्र दुकान रस्त्यालगत असल्यामुळे त्यावर धूळ जमून ती खराब होत असे. त्यामुळे आता त्यांना खास शोकेसमध्ये ठेवण्यात आले आहे. दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, फ्रान्स, जपान अशा अनेक देशांतून ग्राहक मित्रांनी आणलेल्या घंटा इथं आहेत.

अशोक कुमार नावाच्या एका ग्राहकाने फ्रान्समधून त्यांना पहिली काचेची घंटा आणून दिली. ही घंटा ग्राहकांना चांगलीच आवडली. त्यानंतर अनेकांनी आपल्याला घंटा भेट म्हणून दिल्या, असे याचे मालक विनोद तिवारी यांनी सांगितले. तिवारी यांचा स्वत:चा देखील घंटा जमवण्याचा संग्रह आहे. त्यांच्या नावावर 3 वर्ल्ड रेकॉर्ड असून घंटांचा संग्रह करणारे ‘जगातले पहिले पानवाले’ अशी त्यांची ओळख आहे. या घंटा जमवायला त्यांना 20 वर्षे लागली. पितळ, काच, चिनी माती अशा विविध पदार्थांपासून बनवलेल्या घंटा येथे पाहायला मिळतात.

Back to top button