कारखान्यांमध्ये कोट्यवधी डासांची निर्मिती | पुढारी

कारखान्यांमध्ये कोट्यवधी डासांची निर्मिती

बीजिंग : डासांमुळे होणार्‍या अनेक आजारांमुळे जगभरात दरवर्षी कोट्यवधी संख्येने लोकांचा मृत्यू होतो. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा प्रकारचे अनेक आजार डास चावल्याने होत असतात. वेळीच योग्य उपचार न झाल्यास प्रसंगी हे आजार रुग्णाच्या प्राणावर बेतणारे असतात. अलीकडच्या काही काळात जगभरात डासांचे प्रमाण वाढतच आहे. अनेक आजारांना जबाबदार ठरणार्‍या या डासांचा नायनाट करण्यासाठी चीनने अनोखा उपाय अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे.

चीनमध्ये वाईट डासांना समूळ नष्ट करण्यासाठी चांगल्या डासांच्या निर्मितीचे कारखाने सुरू करण्यात आले आहेत. हे डास आजार पसरविणार्‍या डासांची पैदास रोखण्याचे काम करतात. सखोल संशोधनानंतर चीनने चांगल्या डासांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे. चीनमधील दक्षिण भागातील गुआंगझोऊमध्ये एक मोठा कारखाना आहे. तेथे या चांगल्या डासांची निर्मिती केली जाते. या कारखान्यात आठवड्याला सुमारे 2 कोटी चांगल्या डासांची निर्मिती केली जाते. हे डास वोलबेचिया बॅक्टेरियाने संक्रमित असतात.

चीनमधील येत सेत युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार वोलबेचिया बॅक्टेरियाने संक्रमित असलेल्या डासांची निर्मिती केल्यास ते आजार पसरविणार्‍या मादी डासांची प्रजनन क्षमता घटवू शकतात. यामुळेच चीनमध्ये चांगल्या डासांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. या डासांना वोलबेचिया मॉस्किटो असेही म्हटले जाते. हे डास तयार झाले की, त्यांना जंगल अथवा अन्य ठिकाणी सोडले जाते. तेथे ते आजार पसरविणार्‍या मादी डासांना वांझ बनवतात.

Back to top button