‘या’ शिळांवर प्रारंभिक जीवसृष्टीच्या खुणा | पुढारी

‘या’ शिळांवर प्रारंभिक जीवसृष्टीच्या खुणा

सिडनी : पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या विविध स्तरांच्या शिळांवर पृथ्वीवरील सर्वात प्रारंभिक काळातील जीवसृष्टीच्या खुणा आहेत. प्रकाशसंश्लेषण करणार्‍या काही सूक्ष्म जीवांनी हे विविध थरांचे दगड बनवलेले आहेत. त्यांना स्ट्रोमॅटोलाईटस् असे म्हटले जाते. यापैकी सूक्ष्म जीवांनी बनवलेले सर्वात जुने स्ट्रोमॅटोलाईट 3.43 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. यापेक्षाही काही जुने नमुने तिथे असू शकतात.

अब्जावधी वर्षांच्या काळाच्या ओघात या स्ट्रोमॅटोलाईटस्वरील जैविक घटक निघून गेलेले आहेत. त्यामुळे काही संशोधकांच्या मतानुसार ते प्राचीन काळातील जीवाणूंनीच बनवलेले आहेत की भूगर्भीय हालचालींमुळे या रचना बनलेल्या आहेत हे स्पष्ट होत नाही. मात्र, एका नव्या संशोधनानुसार ही प्रारंभिक काळातील जीवांचीच रचना आहे. लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममधील पॅलियोंटोलॉजिस्ट केरॉन हिकमन-लेविस यांनी सांगितले की या शिळांच्या विशिष्ट थरांमध्ये आम्ही काही विशिष्ट सूक्ष्म रचना शोधून काढण्यात यश मिळवले आहे.

या रचना जैविक प्रक्रियेला प्रकर्षाने दर्शवणार्‍याच आहेत. अशा स्वरूपाचा शोध हा मंगळभूमीवरही प्राचीन काळातील जीवसृष्टीचे पुरावे शोधून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या शिळांमधील थरात जैविक विकासाच्या खुणा आहेत. तेथील काही डोमसारख्या रचना फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेकडे निर्देश करणार्‍या आहेत. या रचनेतील जे जीवाणू इतरांच्या तुलनेत अधिक सूर्यप्रकाशात होते त्यांची वाढ तुलनेने अधिक झाली होती. काही स्तंभासारख्याही रचना याठिकाणी आढळून आल्या आहेत.

Back to top button