तुतानखामेनच्या मकबर्‍यातील हरवलेल्या दागिन्याचा शोध | पुढारी

तुतानखामेनच्या मकबर्‍यातील हरवलेल्या दागिन्याचा शोध

कैरो : इजिप्तचा तरुण वयातच मृत्युमुखी पडलेला फेरो म्हणजेच राजा तुतानखामेनच्या मकबर्‍याचा 4 नोव्हेंबर 1922 ला शोध लावण्यात आला होता. सोन्या-चांदीच्या अनेक वस्तू व अलंकारानी भरलेल्या या मकबर्‍याने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचवेळी या खजिन्यातील एक दागिना गहाळ झाला होता. मकबर्‍यातील सर्व खजिना ही इजिप्तची संपत्ती आहे व याबाबतचे तिथे कायदे असूनही हा प्रकार घडला होता. आता इतक्या वर्षांनंतर हा सुंदर दागिना पुन्हा सापडला आहे.

हॉवर्ड कार्टर या ब्रिटिश आर्कियोलॉजिस्टच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम झाली होती. त्यांनीही काही कलाकृती आपल्यासमवेत नेल्या असाव्यात असे म्हटले जात होते. फ्रान्सच्या मोंटपेलियर येथील पॉल-वॅलेरी युनिव्हर्सिटीतील इजिप्टोलॉजीचे प्राध्यापक मार्क गॅबोल्ड यांनी हरवलेल्या अशा काही कलाकृती ओळखल्या असून त्या कुठे असाव्यात याबाबतही संशोधन केले आहे. 1920 च्या दशकात फोटोग्राफर हॅरी बर्टन यांनी मकबर्‍यातील खजिन्याचे जे फोटो टिपले होते त्यांचाही त्यांनी अभ्यास केला होता.

या फोटोंमधील कलाकृतींची तुलना त्यांनी अनेक वस्तुसंग्रहालये व लिलावाशी संबंधित वेबसाईटस्वरील कलाकृतींशी केली. त्यामध्येच तुतानखामेनच्या छातीवर असलेल्या एका मोठ्या हाराचा समावेश आहे. हा हार आता तुकड्या तुकड्यांमध्ये अनेक ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यापैकी काही भाग स्वतः कार्टरने मिसौरीतील कन्सास सिटीमध्ये असलेल्या नेल्सन-अ‍ॅटकिन्स म्युझियम ऑफ आर्ट या वस्तुसंग्रहालयात ठेवला होता. याच हारातील काही भाग एका अनामिक व्यक्तीकडे आहे. 2015 मध्ये त्याने हा भाग एका लिलावात विकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

Back to top button