आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक लवकरच होणार निरुपयोगी? | पुढारी

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक लवकरच होणार निरुपयोगी?

न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ने गेल्या 22 वर्षांपासून जगाला अनेक चांगले परिणाम दिले आहेत. मात्र, सध्या हे अंतराळ स्थानक आपल्या शोधामुळे नव्हे तर अन्य अनेक घटनांमुळे चर्चेत आहे. 1998 मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले हे अंतराळ स्थानक लवकरच निरुपयोगी होणार असल्याचे बोलले जात आहे.

चीन आपले स्वतःचे अंतराळ स्थानक अवकाशात स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत अमेरिका व रशियाचे हे अंतराळ स्थानक निरुपयोगी ठरल्यास त्याचा लाभ चीनला मिळण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी अंतराळ स्थानकाच्या रशियन भागात धूर येत असल्याचा अलार्म वाजला. यामुळे मोठा अनर्थ घडता घडता वाचला. हे अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती ताशी 17 हजार मैल वेगाने फिरत असते. तसेच उच्च दबाव असलेल्या चेंबरमध्ये किमान चार अंतराळ यात्री उपस्थित असतात.

गेल्या अनेक महिन्यांपासून अशा अनेक घटनांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक चर्चेत आहे. यामुळे या स्थानकाच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, अमेरिकेनेही हे अंतराळ स्थानक 2030 पर्यंत कार्यरत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या या अंतराळ स्थानकात अमेरिकेच्या नासाचे मार्क वैंडे हेई, शेन किमबोर्ग आणि मेगन मॅकऑर्थर तसेच रशियाचे ओलेग नोवित्सकी आणि प्योत्र दुबरोव, जपानचे आकिहिको होशिदे, युरोपीय स्पेस एजन्सीचे थॉमस पेसक्वेट कार्यरत आहेत.

Back to top button