युरोपला बसतोय ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका | पुढारी

युरोपला बसतोय ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका

लंडन : ग्लोबल वॉर्मिंग अथवा जागतिक तापमानवाढ ही समस्या आता दिवसेंदिवस गंभीर स्वरूप प्राप्त करू लागली आहे. संपूर्ण जगभरात याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. प्रत्येक वर्षागणिक जगाच्या सरासरी तापमानात वाढ होऊ लागली आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक परिणाम युरोपवर झाला आहे. गेल्या तीन दशकांत पृथ्वीवरील अन्य ठिकाणांच्या तुलनेत युरोप खंड हा सर्वात जास्त उष्ण झाला आहे. उष्ण होण्याचा हा वेग दुप्पट बनला आहे.

‘वर्ल्ड मेटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशन’च्या वतीने जारी करण्यात आलेल्या अहवालात युरोपचे तापमान वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, होरपळून टाकणारे ऊन, जंगलांची आग, पूर व अन्य नैसर्गिक कारणांमुळे युरोपचे तापमान वाढत आहे. जलवायू परिवर्तनासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातील इशार्‍यानुसार वाढत्या तापमानामुळे बर्फाच्छादित प्रदेशातील ग्लेशियर्स वेगाने वितळतील. याशिवाय युरोपमध्ये भीषण उन्हाळा जाणवेल. यामुळे ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट येईल. तसेच वाढत्या तापमानाचा प्रामुख्याने अल्पाईन ग्लेशियर्सला फटका बसण्याची शक्यता आहे.

जलवायू परिवर्तनामुळे सध्या भूमध्य सागराचे पाणीही वेगाने उष्ण होत आहे. जलवायू परिवर्तनामुळे 2021 मध्ये संपूर्ण युरोपमध्ये भीषण उन्हाळा, दुष्काळ, जंगलांची आग अशा घटना घडल्या.

Back to top button