हृदयविकार : महिलांनाे ‘ही’ लक्षणे दिसताच व्हा सावधान..! | पुढारी

हृदयविकार : महिलांनाे ‘ही’ लक्षणे दिसताच व्हा सावधान..!

नवी दिल्ली : खराब जीवनशैली, प्रचंड तणाव आणि खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयींमुळे महिलांना हृदयासंबंधीचे आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी असे मानले जात होते की, हृदयासंबंधीचे आजार महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त होतात. मात्र, सध्या हा आजार महिला आणि पुरुषांमध्ये सर्वसामान्य बनला आहे.

नव्या संशोधनातून असे स्पष्ट होते की, हृदयासंबधीचे विकार आणि हृदयविकाराचा धक्का बसण्याचे संकेत महिला वेळेवर ओळखू शकत नाहीत. यामुळेच महिलांमध्ये हार्टअ‍ॅटॅकचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे.

शास्त्रज्ञांच्या मतानुसार हार्टअ‍ॅटॅक येण्यापूर्वी सुमारे एक महिना अगोदर आपल्या शरीरात काही समस्या जाणवत असतात. यामध्ये थकवा जाणवणे, झोप पुरेशी न होणे, श्वास घेण्यात समस्या जाणवणे, घाम येणे, चक्कर येणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अमेरिकेतील हॉर्वर्ड हेल्थ इन्स्टिट्यूटच्या वतीने अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या 95 टक्के महिलांमध्ये हार्टअ‍ॅटॅक येण्यापूर्वी एक महिना अगोदरच काही लक्षणे दिसून आली. जर का या महिलांनी ही लक्षणे ओळखून त्यावर उपचार घेतले असते तर त्या हार्टअ‍ॅटॅकपासून बचावल्या असत्या. या संशोधनात 500 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

पुरुषांमध्ये हार्टअ‍ॅटॅक येण्यापूर्वी सर्वसामान्य लक्षण म्हणजे छातीत कळ येणे, हे आहे. मात्र, महिलांमध्ये ही लक्षणे जरा वेगळी आहेत. यामध्ये अतिथकवा जाणवणे, झोपेची समस्या निर्माण होणे, श्वास घेण्यात अडचणी येणे तसेच छातीत दुखणे ही लक्षणे आहेत.

Back to top button