गुलाबी थंडीत रोग प्रतिकारक शक्ती वाढवा | पुढारी

गुलाबी थंडीत रोग प्रतिकारक शक्ती वाढवा

नवी दिल्ली : सध्या कोरोनानंतर अनेक संसर्गजन्य रोगांचा पादुर्भाव वाढत आहे. बदलत्या वातावरणामुळे लोकांना सर्दी खोकल्यासह अन्य संसर्गजन्य रोग होत आहेत. कोरोना महामारीमुळे लोकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. त्यामधील एक चांगली सवय म्हणजे हात धुणे; पण सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळतोय, त्यामुळे लोक पुन्हा या सवयींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. थंडीला सुरुवात झाली आहे. बदलत्या मोसमात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशावेळी आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

टायफॉईड हा एक जीवाणूजन्य आजार आहे. दूषित अन्न आणि दूषित पाणी प्यायल्यामुळे टायफॉईड पसरण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला टायफॉईडची लागण झाली असेल आणि ती शौचास गेली असेल, शौचाला जाऊन आल्यावर हात नीट स्वच्छ धुतले नाहीत आणि अन्न किंवा इतर वस्तूंना हात लावला तर तिथे टायफॉईडचे जीवाणू पसरतात. जर एखाद्या निरोगी व्यक्तीने त्या व्यक्तीला किंवा त्याने स्पर्श केलेल्या इतर वस्तूंना स्पर्श केला तर ते जीवाणू निरोगी व्यक्तीपर्यंत आणि नंतर त्याच्या हाताद्वारे तोंडापर्यंत पोहोचतात.

यामुळे निरोगी व्यक्तीच्या शरीरात जीवाणू पोहोचून त्यालाही टायफॉईडटी लागण होते. त्यामुळे हात नियमितपणे स्वच्छ धुतले पाहिजेत. जर तुम्ही आज टायफॉईड जीवाणूच्या संपर्कात आला असाल, तर याची लक्षणे लगेच दिसत नाहीत. टायफॉईडटी लक्षणे दिसायला किमान एक ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. याची लक्षणे म्हणजे डोकेदुखी, अशक्तपणा, थकवा, जास्त घाम येणे, कोरडा खोकला, वजन झपाट्याने कमी होणे, पोटदुखी, अतिसार आणि शरीरावर पुरळ येणे ही आहेत.

Back to top button