सामाजिक प्रवृत्तीचा ‘कोळी’ | पुढारी

सामाजिक प्रवृत्तीचा ‘कोळी’

सिडनी : पृथ्वीवरील बहुतांश प्राणी पाठीचा कणा नसलेले (असस्तन)आहेत. यामध्ये कीटक, कोळी, सरपटणारे प्राणी आणि जलचर प्राण्यांचा समावेश होतो. हे प्राणी जैविक पातळी संतुलित राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. असंख्य असस्तन प्राण्यांचा वापर मानवी खाद्यान्नात होतो. यातील बर्‍याच प्राण्यांची माणसाला भीती वाटत असते. मात्र, यातील अनेक असस्तन प्राणी मानवी जीवनासाठी घातक नसतात.

यातील एक प्राणी म्हणजे जंगली कोळी! या कोळ्याचा (डेलेना कँसरराईडस्) मूळ अधिवास ऑस्ट्रेलियातील. ही कोळ्याची प्रजाती सुखलेल्या एका झाडीखाली समूहासह राहते. हे कोळी खूपच मवाळ प्रवृत्तीचे असतात, ते चुकुनच कधीतरी माणसाला डंक मारतात. हे कोळी वयस्क मादी असलेल्या समूहांबरोबर राहतात आणि त्यांना 300 अपत्ये असतात. हे कोळी आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी मात्र खूपच आक्रमक असतात. त्यांच्याकडे वेळीच धोका समजून घेण्याची क्षमता असते.

रात्रीच्यावेळी अन्नाची सोय करण्यासाठी हे कोळी समूहाने बाहेर पडतात. यावेळी हे कोळी एकमेकांशी भांडत बसण्याऐवजी मिळालेले खाद्यान्न वाटून खातात. मरण पत्करतील, मात्र हे कोळी एकमेकांना कधीच मारून खात नाहीत. मोठ्या प्रमाणात कीडे खाऊन निसर्गातील किड्यांची संख्या मर्यादित राखण्यात मदत करतात. हे कोळी महाकाय झुरळ (मॅक्रोपेनिस्थिया रायनोसर्स) खातात. ही झुरळाची प्रजाती पर्यावरणासाठी खूपच हानिकारक असते.

Back to top button