उतारवयात अस्थिभंगाची शक्यता 5 टक्के अधिक | पुढारी

उतारवयात अस्थिभंगाची शक्यता 5 टक्के अधिक

लंडन : वृद्ध लोक वारंवार एकसारखे पडू लागले तर तो एक आजार असू शकतो. हा आजार दुसर्‍या आजारांमुळे होतो. तसेच तो दुसर्‍या आजारांचे कारणही बनू शकतो. यामुळे 65 वर्षांवरील लोकांमध्ये पडल्याने हाडे मोडण्याची शक्यता पाच टक्के अधिक असते. ‘अचानक पडणे’ ही बाब कोणत्याही वयात होत असली तरी जसजसे वय वाढत जाते, तसे पडण्याच्या घटना वारंवार घडू लागतात.

वृद्धत्वात शरीराला काहीवेळा मेंदूची म्हणावी तशी साथ मिळत नाही. यामुळेच अशा वयात बुजूर्ग लोक पडण्याच्या घटना घडत असतात. यामुळे संबंधित व्यक्ती जखमी होते, अथवा तिची हाडे मोडतात आणि ती जुळण्यासाठी मोठा अवधी लागतो. याशिवाय प्रसंगी मृत्यूचा धोकाही वाढतो. यासंदभांत ब्रिटनच्या शासकीय अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार 65 वर्षांवरील दोन तृतियांश आणि 80 वर्षे वयोगटाखालील अर्धे वयस्क लोक वर्षातून एकदा तरी पडतच असतात. यामुळे वयस्क लोकांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज निर्माण होते.

डॉक्टर डेविड ओलिव्हर यांच्या मते, स्ट्रोकच्या तुलनेत पडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या वयस्क लोकांची संख्या अधिक असते. 65 वर्षांवरील लोकांमध्ये अचानक पडण्याची उदाहरणे वाढू लागली आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये 2010 ते 2011 या अवधीत सुमारे 2.34 लाख वयस्क लोक पडल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पोहोचले होते. यामुळे उतारवयातील लोक पडू नये, याची खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Back to top button