ध्वनी प्रदूषणाने वाढतोय पक्ष्यांचा आवाज | पुढारी

ध्वनी प्रदूषणाने वाढतोय पक्ष्यांचा आवाज

बर्लिन : जगभरात सध्या ध्वनी प्रदूषण प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे मानव, पक्षी, जनावरे एवढेच नव्हे तरी झाडांनाही याचा फटका बसू लागला आहे. मोठमोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागही ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालला आहे. एकूणच काय या प्रदूषणामुळे ‘इको-सिस्टीम’ प्रभावित होऊ लागली आहे.

प्रमाणापेक्षा जास्त आवाजामुळे ‘मेटाबॉलिज्म’शी संबंधित जसे की, उच्च रक्तदाब, मधुमेह व अन्य आजारांचा धोका वाढू लागतो. याशिवाय हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड मोठा आणि सातत्याने होणार्‍या आवाजाने एकट्या युरोप खंडात दरवर्षी सुमारे 48 हजार लोक हृदयविकाराच्या विळख्यात सापडू लागले आहेत. तर 12 हजार लोकांचा अवेळी मृत्यू होत आहे.

जर्मनीमधील पर्यावरण संस्थेचे ध्वनी प्रदूषण विशेषज्ञ थॉमस माईक यांच्या मते, एखादे घर अथवा प्लॅट मुख्य मार्गावर असेल तर तेथे कमी भाडे द्यावे लागते; पण याचा अर्थ असाही होतो की, ज्या लोकांचे उत्पन्न कमी आहे, असे लोक जास्त गोंधळ असलेल्या ठिकाणी राहण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ते ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असतात. ध्वनी प्रदूषणामुळे पक्षीही प्रभावित होऊ लागले आहेत. यासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनातून असे स्पष्ट झाले की, पक्षीही मोठ्या आवाजात गाऊ तसेच ओरडू लागले आहेत, जेणेकरून सहकार्‍यांशी चर्चा होईल.

Back to top button