झोपल्यावर झाडावरून का पडत नाहीत पक्षी? | पुढारी

झोपल्यावर झाडावरून का पडत नाहीत पक्षी?

नवी दिल्ली : माणूस झोपला की त्याचा शरीरावरील ताबा सुटतो. त्यामुळे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये आपण पाहतो की झोपलेला माणूस बाजूला कलंडत असतो. माणूस अशाप्रकारे झोपेत आपले संतुलन ठेवू शकत नसला तरी अनेक पशू-पक्ष्यांना ही कला अवगत आहे. विशेषतः पक्षी झाडांच्या फांद्यावर झोपत असूनही ते झोपेत खाली का पडत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

पक्ष्यांना माणसाप्रमाणे जास्त वेळ झोपण्याची गरज भासत नाही. पक्ष्यांमध्ये गाढ झोपेत जाण्याचा वेळ केवळ दहा सेकंदांचा असतो. पक्षी एक डोळा उघडा ठेवूनही झोपू शकतात हे विशेष! त्यांचा मेंदूचा जो भाग सक्रिय असतो त्याच्याविरुद्ध बाजूचा डोळा उघडा असतो. याचा अर्थ त्यांच्या मेंदूचा उजवा भाग सक्रिय असेल तर त्यांचा डावा डोळा उघडा असतो. त्यामुळे झोपेतही पक्षी सावध राहू शकतात व शिकार्‍यांपासून स्वतःचा बचावही करू शकतात. पक्ष्यांची पायांची रचनाही अशी असते की ते फांद्यांवर आपली पकड घट्ट ठेवू शकतात. एखाद्या कुलुपाप्रमाणे ही पकड घट्ट असते. पोपट फांदीवर उलटे लटकूनही पडत नाहीत हे अनेकांनी पाहिले असेल.

Back to top button