केस सरळ करण्याच्या उत्पादनांनी अमेरिकेत अनेकींना कर्करोग | पुढारी

केस सरळ करण्याच्या उत्पादनांनी अमेरिकेत अनेकींना कर्करोग

वॉशिंग्टन : सौंदर्य प्रसाधनांचा जपूनच वापर करणे हितावह ठरत असते. आता अमेरिकेत केस सरळ करण्याच्या उत्पादनांचा धोका दिसून आला आहे. अमेरिकेतील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची जोखीम वाढली आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. हेयर स्ट्रेटनिंग उत्पादनांचा वापर करणार्‍या महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे.

अमेरिकेत गर्भाशय कर्करोगाच्या प्रकरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात अनेकपटींनी वाढ झाली आहे. अमेरिकेत 2022 मध्ये गर्भाशय कर्करोगाच्या 65.950 प्रकरणे समोर आली होती. कर्करोगाच्या एकूण प्रकरणांत तीनपटीने वाढ झाली आहे. अमेरिकेत गर्भाशय कर्करोगामुळे यंदा गर्भाशय कर्करोगामुळे 12 हजार 550 महिलांचा मृत्यू झाला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार डोक्याची त्वचा व केस यांच्यात मुरलेले रसायन शरीरभर पसरते. यातून अनेकदा त्वचेत दाह जाणवू लागतो. या अध्ययनानुसार संशोधकांनी 35 ते 74 या वयोगटातील 33 हजार 497 अमेरिकन महिलांचा अभ्यास केला. प्रकल्प प्रमुख अलेक्झांड्रा व्हाईट म्हणाल्या, हेयर स्ट्रेटनरचा वापर न करणार्‍या केवळ 1.64 टक्के महिलांमध्ये सत्तरीपर्यंत गर्भाशयाशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका असतो.

हेअर स्ट्रेटनरचा वापर करणार्‍या 4.05 टक्के महिलांमध्ये असा धोका असतो. संशोधनात हेअरडाय, ब्लीच, हायलाईटस् किंवा पर्मचा गर्भाशयाच्या कर्करोगाशी काहीही संबंध नसल्याचे दिसून आले. मात्र, एका अन्य संशोधन प्रकल्पातील संशोधक ची-जंग चांग म्हणाले, कायमस्वरूपी हेअर डाय-स्ट्रेटनरचा वापर केल्यास स्तन कर्करोगाचा धोका वाढतो. 60 टक्के कृष्णवर्णीय महिला केसांचे स्ट्रेटनिंगसाठी विशिष्ट उत्पादने जास्त वापरतात. त्यामुळे अशी जोखीम वाढते.

Back to top button