Moon : बायकोला ‘तो’ खरोखरच नेणार चंद्रावर! | पुढारी

Moon : बायकोला ‘तो’ खरोखरच नेणार चंद्रावर!

वॉशिंग्टन ः राजकीय नेत्यांनी निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आणि प्रेयसीसमोर भावूक होऊन प्रियकराने दिलेली वचनं यामध्ये फारसा फरक नसतो! निवडणुकीनंतर पाच वर्षे आणि लग्नानंतरची आयुष्यभराची संसाराची वर्षे त्याला साक्ष असतात. ‘तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर (Moon) नेईन’… असे एक ना दोन, प्रेमात अशी कितीतरी वचनं दिली जातात, स्वप्नं दाखवली जातात. प्रत्यक्षात ही स्वप्नं साकार करणं काही शक्य नसतेच; पण एका व्यक्तीने मात्र हे अशक्य शक्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. एका नवर्‍याने बायकोसाठी चंद्र-तारे जमिनीवर आणले नाहीत; पण तिलाच तो चंद्रावर नेणार आहे. बायकोला चंद्रावर नेणारा हा जगातील पहिला नवरा असेल. या माणसाचे नाव आहे डेनिस टिटो. हा जगातील पहिला अंतराळ पर्यटकही आहे.

Moon : चंद्रावर जाण्यासाठी तिकिटे बुक

82 वर्षांचे डेनिस अमेरिकेतील मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी स्वतःसाठी आणि बायकोसाठी असे चंद्रावर जाण्याची दोन तिकिटे बुक केली आहेत. पत्नी अकिको यांना ते चंद्राची सफर घडवणार आहेत. 2001 साली त्यांनी स्वतःच्या पैशाने अंतराळात फिरणारी पहिली व्यक्ती म्हणून विक्रम केला होता. रशियन यानातून ते अंतराळ सफरीवर गेले होते. त्यावेळी रशियन स्पेस एजन्सीला पैशांची गरज होती आणि डेनिस यांनी त्यांना 160 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. आता ते पत्नीसह अंतराळात जाण्याच्या तयारीत आहेत. एलन मस्कची कंपनी स्पेस एक्स स्पेस टुरिझमच्या तयारीत आहे.

याच मिशनचा भाग म्हणून डेनिसने तिकीट बुक केले आहेत. स्पेस एक्सने स्टारशिप रॉकेटचा प्रोटोटाईम तयार केला आहे. ज्यामधून डेनिस चंद्रावर जाणार आहेत. डेनिस यांनी स्पेस एक्ससह ऑगस्ट 2021 मध्ये एक करार केला होता. त्यानुसार पुढील 5 वर्षांत त्यांना कधीही अंतराळयात्रा करता येईल. दरम्यान, स्पेस एक्सचे हे मिशन कधी सुरू होणार, याला किती खर्च येणार याबाबत अद्याप स्पेस एक्सने माहिती दिलेली नाही. डेनिस यांनी स्वतः एरोनॉटिक्स आणि एस्ट्रोनॉटिक्स इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण घेतलं आहे. 1960 च्या दशकात ते ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये कामही करत होते. त्यानंतर त्याने स्वतःची इन्वेस्टमेंट मॅनेजमेन्ट फर्म सुरू केली.

हेही वाचलंत का?

Back to top button