सर्वात शक्तिशाली दुर्बीण डिसेंबरमध्ये होणार लाँच - पुढारी

सर्वात शक्तिशाली दुर्बीण डिसेंबरमध्ये होणार लाँच

वॉशिंग्टन : जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बीण ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ अवकाशात पाठवण्याची तारीख ‘नासा’ने जाहीर केली आहे. ही अंतराळ दुर्बीण 18 डिसेंबरला फ्रेंच गयाना येथून लाँच करण्यात येईल. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘एरियन-5’ या शक्तिशाली प्रक्षेपकाद्वारे ही अंतराळ दुर्बीण लाँच केली जाणार आहे.

नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी यांनी संयुक्तरीत्या या अवकाश दुर्बिणीची निर्मिती केली आहे. कॅलिफोर्नियात नुकत्याच या दुर्बिणीच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत.

या दुर्बिणीच्या निर्मितीला 2005 मध्ये सुरुवात झाली. कोरोना महामारीमुळे या दुर्बिणीचे काम काही महिने ठप्प झाले होते. अखेर आता या दुर्बिणीला अवकाशात नेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दुर्बिणीच्या निर्मितीला 10 अब्ज डॉलर्सचा खर्च आला आहे.

एखाद्या टेनिस कोर्टइतक्या आकाराची ही दुर्बिण आहे. 18 छोट्या षटकोनी आरशांपासून बनवलेली 6.5 मीटर व्यासाची, सोन्याचा मुलामा असलेली व बेरेलियम धातूपासून बनवलेली भव्य लेन्स या दुर्बिणीत असणार आहे. व्हिजिबल म्हणजेच द़ृश्य प्रकाश, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट अशा तीन प्रमुख तरंग लांबीच्या माध्यमातून ही दुर्बीण अवकाशाचा वेध घेईल.

या दुर्बिणीमुळे अवकाशातील अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकेल. ‘हबल’ ही अवकाश दुर्बीण आता जुनी झाली असून तिच्यामध्ये वारंवार बिघाड निर्माण होत आहेत. त्यामुळे आता अशा नव्या अवकाश दुर्बिणीची आवश्यकता निर्माण झाली होती.

Back to top button