इंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा! - पुढारी

इंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा!

जकार्ता : विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धीदेवता श्री गणेशाचे शुक्रवारी शुभागमन होत आहे. गणपती बाप्पा ची भारतातच नव्हे तर अन्य अनेक देशांमध्येही प्राचीन मंदिरे आहेत. इंडोनेशियात तर गणपती बाप्पा चे वेगळेच स्थान आहे. तेथील नोटेवरही गणेश विराजमान आहेत. इंडोनेशियाच्या माऊंट ब्राेमो या ज्वालामुखीच्या पर्वतावर तब्बल 700 वर्षांपूर्वीची गणेशमूर्ती आहे.

इंडोनेशियात एकूण 141 ज्वालामुखी आहेत. त्यापैकी 130 ज्वालामुखी अद्यापही सक्रिय आहेत. त्यामध्येच माऊंट ब्राेमोचा समावेश होतो. हा ज्वालामुखी पूर्व जावा प्रांतातील ब्राेमो टेनगर सेमेरू नॅशनल पार्कमध्ये आहे. जावनीज भाषेतील ‘ब्राेमो’ म्हणजे ब्रह्मा. मात्र, हा पर्वत तेथील गणेशामुळे अधिक प्रसिद्ध आहे. ही गणेशमूर्ती ज्वालामुखीच्या मुखाजवळच आहे.

या विघ्नहर्त्यामुळे ज्वालामुखीच्या संकटापासून आपले रक्षण होते अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. सातशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी ही गणेशमूर्ती स्थापन केली असे जावामधील लोक सांगतात. त्यावेळेपासून या गणेशाची अव्याहतपणे पूजा सुरू आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी त्यामध्ये खंड पडत नाही हे विशेष. याठिकाणी वर्षातून एकदा पंधरा दिवसांचा उत्सव असतो आणि ‘यज्ञाया कासादा’ नावाचा विधी एका विशेष दिवशी केला जातो.

Back to top button