अल्झायमरचा छडा लागेल 9 वर्षे आधीच! | पुढारी

अल्झायमरचा छडा लागेल 9 वर्षे आधीच!

लंडन : इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी डिमेन्शिया, अल्झायमर्ससारख्या उतारवयात होणार्‍या स्मृतिभ्रंशाशी संबंधित मेंदूच्या असाध्य आजारांवर नवे संशोधन केले आहे. या आजारांची लक्षणे दिसण्यापूर्वी नऊ वर्षे आधीच त्यांचा छडा लागू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

स्मृतिभ्रंशाचा धोका असलेल्या रुग्णांचा या नवीन अभ्यासाचा सर्वाधिक फायदा होईल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन्स या आजाराचे किमान एखादे लक्षण आढळल्यानंतर निदान केले जाते. तर मेंदूत होणारे हे बदल अनेक वर्षांपूर्वी किंवा अगदी दशकांपूर्वी घडू लागतात.अभ्यासात सहभागी शास्त्रज्ञांनी 40 ते 69 वयोगटातील 5 लाख जणांच्या बायोमेडिकल डेटाचे विश्लेषण केले.

त्यात जनुकीय माहिती, जीवनशैली आणि आरोग्याशी संबंधित माहिती घेण्यात आली होती. डेटामध्ये लोकांची स्मरणशक्ती, समस्या सोडवणे, प्रतिक्रिया वेळ, आकलन शक्ती आणि वजन वाढण्याची माहिती देखील होती. परिणामांमध्ये असे आढळून आले की अल्झायमर असलेल्या लोकांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य, प्रतिक्रिया देण्याची वेळ, संख्या लक्षात ठेवण्याची आणि जोडण्याची क्षमता ही निरोगी लोकांपेक्षा खूपच खराब होती.

या लोकांचा इतिहास पाहिला, तेव्हा कळाले की त्यांच्या मेंदूची क्षमता काही वर्षांपूर्वीपासूनच कमकुवत होत आली आहे. संशोधनात सहभागी असलेले केम्ब्रिज विद्यापीठातील कनिष्ठ डॉक्टर नोल स्वादिवुधिपोंग म्हणाले की, रुग्णामध्ये स्मृतिभ्रंशाची कोणतीही ठोस लक्षणे दिसण्याआधी सौम्य लक्षणे दिसू लागतात. आता या अभ्यासाच्या मदतीने, 50 वर्षांवरील लोक ज्यांना उच्च रक्तदाब आहे, जे व्यायाम करत नाहीत आणि ज्यांना मेंदूच्या आजारांचा धोका आहे, त्यांची आधीच तपासणी केली जाऊ शकते.

Back to top button