महिलेच्या डोळ्यातून काढल्या 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस | पुढारी

महिलेच्या डोळ्यातून काढल्या 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस

वॉशिंग्टन : कॉन्टॅक्ट लेन्सबाबत निष्काळजीपणा करून चालत नाही. त्यामुळे द़ृष्टी गमावण्याचाही धोका असतो. मात्र, अनेक लोक त्याबाबत पुरेसे जागरूक नसतात. सौंदर्यवृद्धीसाठीही काही लोक अशा लेन्सेस वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्स वेगवगळ्या रंगांत उपलब्ध असतात व डोळ्यांच्या बुब्बुळांचा हवा तसा रंग धारण करून व्यक्ती चारचौघात उठून दिसू शकते. मात्र, याबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो. एका अमेरिकन महिलेसोबतही असेच घडले, ती डॉक्टरांकडे गेल्यावर तिची गंभीर चूक लक्षात आली. डॉक्टरांनी या महिलेच्या डोळ्यांतून एक, दोन नव्हे तर 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. या कॉन्टॅक्ट लेन्सेसचा गुच्छच तयार झाला होता!

कॅलिफोर्नियामध्ये राहणारी ही महिला दररोज कॉन्टॅक्ट लेन्स लावत असे, मात्र रोज रात्री झोपण्याआधी ते काढून ठेवायला ती विसरायची दुसर्‍या दिवशी सकाळी उठून नवीन लेन्स ती लावायची. हा प्रकार जवळपास 23 दिवस चालू होता म्हणजे जवळपास 23 लेन्सेस तिच्या डोळ्यात तशाच होत्या.

काही दिवसांनी तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि सर्व प्रकार पाहून स्वतः डॉक्टर हैराण झाले. आणि मग तिच्या डोळ्यातून त्या 23 लेन्सेस डॉक्टरांनी काढून टाकल्या. डॉक्टर कॅटरिना कुर्तिएवा यांनी सांगितले की लेन्स काढण्यासाठी एक लहान शस्त्रक्रिया उपकरणाचा वापर करण्यात आला. सर्व लेन्स बाईंच्या डोळ्यात थरासारख्या चिकटल्या होत्या. डॉक्टरांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.

Back to top button