कर्जाच्या थकबाकीची आली नोटीस, त्याचवेळी लागली लॉटरी! | पुढारी

कर्जाच्या थकबाकीची आली नोटीस, त्याचवेळी लागली लॉटरी!

तिरुअनंतरपूरम : कुणाचे नशीब कधी उघडेल हे काही सांगता येत नाही. नशिबाचा अनोखा खेळ केरळमधील एका व्यक्तीला अनुभवण्यास आला. या व्यक्तीला 70 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, तेही अशावेळी जेव्हा त्याला पैशांची खूप गरज होती. लॉटरी लागलेल्या या व्यक्तीचं नाव पुकुंजू असं असून, ते केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यातील मैनागपल्ली येथील आहेत. पुकुंजू हे 12 ऑक्टोबर 2022 ही तारीख कधीही विसरणार नाहीत. कारण याच दिवशी त्यांना लॉटरी लागली.

40 वर्षीय पुकुंजू हे मासेविक्रेते असून ते कर्जबाजारी होते; पण त्यांच्या नशिबानं असा खेळ खेळला की, काही तासांतच ते मालामाल झाले. विशेष म्हणजे बँकेने त्याचदिवशी पुकुंजू यांना कर्जाचे हप्ते थकल्यामुळे नोटीस बजावली होती. बँकेने पुकुंजू यांना कर्जाचा हप्ता थकल्यामुळे दुपारी 2 वाजता मालमत्तेवर टाच आणण्याची नोटीस दिली होती.

पुकुंजू यांनी बँकेकडून 12 लाखांचं कर्ज घेतलं होतं; पण ते त्यांना फेडता आलं नव्हतं. मात्र, नोटीस मिळाल्यानंतर दीड तासानंतर त्यांना तब्बल 70 लाखांची लॉटरी लागल्याचा त्यांच्या भावाचा फोन आला आणि एका झटक्यात ते श्रीमंत झाले. घर बांधण्यासाठी पुकुंजू यांनी आठ वर्षांपूर्वी कॉर्पोरेशन बँकेकडून 7.45 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. तेव्हापासून कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आतापर्यंत त्यांच्यावर कर्जाची एकूण थकबाकी व्याजासह सुमारे 12 लाख झाली होती. त्यामुळे बँकेने त्यांना अटॅचमेंट नोटीस पाठवली होती व त्यामुळे ते खूप चिंतेत होते.

आता कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यामुळे स्वतःचं घर जाईल, असं त्यांना वाटू लागलं; पण बँकेने ज्या दिवशी दुपारी 2 वाजता नोटीस पाठवली, त्याचदिवशी दुपारी 3.30 वाजता त्यांना लॉटरी लागली आणि ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं. अक्षय लॉटरीचं सर्वोच्च पारितोषिक जिंकणारे ते भाग्यवान ठरले. विक्रेता गोपाल पिल्लई यांच्याकडून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. लॉटरी लागल्यानंतर पुकुंजू ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलांकडे अगदी धावतच गेले!

Back to top button