तुपामध्ये असतात ‘हे’ आरोग्यदायी गुण | पुढारी

तुपामध्ये असतात ‘हे’ आरोग्यदायी गुण

नवी दिल्ली : उत्तर भारतात ‘देसी घी’ला किंवा आपल्याकडे साजूक तुपाला आहारात मोठेच महत्त्व आहे. पूर्वी आपल्याकडे तूप वाढल्याशिवाय पंगतीत पहिला भात खाल्ला जात नसे. तुपाला इतके महत्त्व येण्यामागे त्याचे आरोग्यदायी गुणधर्मही कारणीभूत आहेत. तुपामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. गायीच्या दुधाचे तूप तर आयुर्वेदात अतिशय लाभदायक मानले जात असते.

आहारतज्ज्ञांनी तुपाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद करून सांगितले आहे. त्यानुसार वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तूप गुणकारी ठरते व एकंदरीतच हृदयाच्या आरोग्याला ते लाभदायक ठरते. जेवणात नियमितपणे तूप वापरल्यास वजन कमी होण्यासही मदत मिळते. तुपामध्ये फॉलिक अ‍ॅसिड आणि सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतात. ते वजनवाढीला प्रतिबंध करतात.

तुपामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्याच्या मदतीने चयापचय क्रिया सुरळीत चालू राहते व रक्तातील शर्करा वाढत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही तूप गुणकारी ठरते. तेलापेक्षा तूप पचण्यास सोपे असते. त्यामुळे पोट हलके राहते, बद्धकोष्ठता किंवा गॅसेसचा त्रास होत नाही. तुपात कार्सिनोजेन्स आढळतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. तुपात ‘क’ जीवनसत्त्वही असते व त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

Back to top button