ऑक्टोबरमध्येही का पडतो आहे पाऊस? | पुढारी

ऑक्टोबरमध्येही का पडतो आहे पाऊस?

नवी दिल्ली : देशभरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. विशेषतः उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने लोक त्रस्त झाले आहेत. मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही काही भाग वगळता देशात पाऊस सुरूच आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्येही इतका पाऊस का पडतो आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.

भारतात नैऋत्य मोसमी वार्‍यांमुळे पाऊस पडतो. हा मान्सून साधारणपणे ऑगस्टपर्यंत पूर्णपणे देश व्यापतो आणि साधारणतः सप्टेंबरच्या मध्यापासून त्याच्या परतीचा प्रवासही सुरू होतो. राजस्थानमधून मान्सून परतीची तारीख 17 सप्टेंबरपासून सांगितली जाते. या कालावधीत पाऊस संपल्यानंतर आर्द्रतेत घट नोंदवली जाते आणि देशाच्या वायव्य भागांमध्ये हळूहळू पाऊस कमी होत जातो. सर्वसाधारणपणे संपूर्ण भारतात मान्सूनची माघार 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होते व या वेळेत देशातील पावसाळा संपतो. मात्र, यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस जोरात सुरू आहे. गेल्यावर्षीही देशाच्या अनेक भागात हीच स्थिती होती. त्यावेळीही मान्सूनची उशिरा माघार हेच कारण होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत देशाच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय राहिला. त्याचा मान्सून परतण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि वायव्य भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू असतानाच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यामुळेच नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याऐवजी खोळंबून राहिला आहे!

Back to top button