जलवायू परिवर्तनामुळे दुष्काळाची शक्यता वाढली | पुढारी

जलवायू परिवर्तनामुळे दुष्काळाची शक्यता वाढली

पॅरिस : मानवनिर्मित जलवायू परिवर्तनामुळे उत्तर गोलार्धात दुष्काळाची शक्यता सुमारे 20 टक्के बळावली आहे, असा इशारा शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने दिला आहे. ‘वर्ल्ड वेदर अ‍ॅट्रिब्यूशन सर्व्हिस’ने जून आणि ऑगस्ट या दरम्यानच्या युरोप, चीन व उत्तर अमेरिकेमधील दुष्काळाचे विश्लेषण केले. या विश्लेषणाअंती जलवायू परिवर्तनामुळे दुष्काळाची शक्यता बळावत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

एएफपीने दिलेल्या माहितीनुसार जशी जागतिक तापमानात वाढ होत आहे, त्यानुसार दुष्काळाची धगही आता वाढण्याची शक्यता आहे. जून आणि ऑगस्ट हे युरोपातील सर्वात उष्ण महिने ठरले. या वाढलेल्या तापमानामुळे या भागात मध्य युगानंतरचा भीषण दुष्काळ पडला. उच्च तापमानामुळे पिके होरपळून गेली. तसेच जंगलांना भीषण आगी लागल्या. गंभीर बाब म्हणजे या घटनेने युरोपच्या पॉवर ग्रीडवरही अतिरिक्त भार पडला.

युरोपमध्ये जून ते जुलैदरम्यान सातत्याने उष्णतेची लाट पहावयास मिळाली. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले. या होरपळणार्‍या उन्हाळ्यात युरोपात अतिरिक्त सुमारे 24 हजार लोकांचा मृत्यू झाला. चीन व उत्तर अमेरिकेनेही असामान्यपणे उच्च तापमान आणि कमी पावसाच्या संकटाचा सामना केला. इटीएच ज्यूरिचचे वातावरणीय आणि जलवायू विज्ञान संस्थेचे प्रो. सोनिया सेनेविरत्ने यांनी सांगितले की, उत्तर गोलार्धातील दाट लोकसंख्या आणि कृषी क्षेत्रात जलवायू परिवर्तनामुळे दुष्काळाची शक्यता बळावत आहे.

Back to top button