पृथ्वीच्या पोटात पाण्याचे भांडार | पुढारी

पृथ्वीच्या पोटात पाण्याचे भांडार

बर्लिन : संशोधकांना पृथ्वीच्या पोटात पाण्याचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व महासागरांच्या आकारमानाच्या तिप्पट मोठा आहे. अर्थात हा साठा एखाद्या महासागरासारखा नसून जलयुक्त खडकांच्या रूपात आहे.

फँ्रकफर्ट येथील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. हा पाण्याचा साठा पृथ्वीच्या आतील भागातील ‘अपर’ व ‘लोअर मॅन्टल’च्या मध्यभागी असलेल्या ट्रान्झिशन झोनमध्ये आहे. संशोधकांना एका दुर्मीळ हिर्‍याचा अभ्यास केल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. हा हिरा आफ्रिकेतील खाणीत सापडला होता. त्याची निर्मिती ही पृथ्वीच्या पोटात 600 किलोमीटर खोलीवरील ट्रान्झिशन झोन आणि लोअर मॅन्टल जिथे मिळतात त्याठिकाणी झाली होती. याठिकाणी ‘रिंगवुडाईट’ नावाचे खनिज मोठ्या प्रमाणात असते. हिर्‍यामध्ये ‘रिंगवुडाईट’ असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय हिर्‍याच्या रासायनिक रचनेचीही माहिती मिळाली आहे. ट्रान्झिशन झोन हा कोरडा भाग नसून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे यामधून स्पष्ट होते असे फ्रँकफर्टमधील गोएथे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर जिओसायन्सेसचे प्राध्यापक फ्रँक ब्रेंकर यांनी सांगितले.

Back to top button