झाडावर उगवतो ‘कान’! | पुढारी

झाडावर उगवतो ‘कान’!

लंडन : ‘भिंतीलाही कान असतात’ असे आपण म्हणतो. त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो तर कुणी तरी आपले बोलणे चोरून ऐकू शकते, असा त्याचा ध्वनीतार्थ आहे! मात्र एखाद्या भिंतीवर नव्हे तर झाडावर खरोखरच कान दिसून आला तर? युरोपमधील काही झाडांवर असे ‘कान’ उगवलेले दिसून येतात. अर्थात ते खरे कान नसून हुबेहूब मानवी कानाच्या आकाराची एक विशिष्ट बुरशी आहे.

या बुरशीला ‘ह्युमन इअर शेप्ड फंगस’ असेच नाव आहे. तिचे सामान्य नाव ‘जेली इअर’ असे आहे. ‘ऑरिक्युलेरिया ऑरिक्यूला-ज्यूडी’ असे या बुरशीचे शास्त्रीय नाव आहे. 19 व्या व 20 व्या शतकात या बुरशीचा औषध म्हणूनही वापर केला जात होता. ही जेली इअर बुरशी 3.5 इंच लांब व 3 मि.मी. जाडीची असून तिचा आकार अगदी कानासारखाच असतो. मात्र, कधी कधी तिला कपाचाही आकार येतो. या बुरशीचे वरचे आवरण लालसर-करड्या रंगाचे असते.

कधी कधी या बुरशीमध्ये जांभळट रंगही दिसतो. ही बुरशी लिबलिबीत असते व तिच्यावर सुरकुत्याही असतात. हळूहळू या बुरशीचा रंग गडद होत जातो. या बुरशीचा औषधासाठी वापर होत असला तरी अन्न म्हणून तिचे सेवन करता येते का याबाबत मतमतांतरे आहेत. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमध्ये मानले जात होते की ही बुरशी खाण्यायोग्य नाही. मात्र, पोलंडमधील लोक ही बुरशी खात असत. ती खाण्यायोग्य होण्यासाठी तिला नीट शिजवले जात असे. ती वाळवल्यानंतर तिच्यामधून भरपूर पोषणमूल्ये मिळतात. 100 ग्रॅम जेली इअरमध्ये 370 कॅलरीज असतात. तसेच 10.6 ग्रॅम प्रोटिन, 0.2 ग्रॅम फॅटस्, 65 ग्रॅम कार्बोहायड्रेटस्, 0.03 मिलीग्रॅम कॅरोटिन असते. जेली इअरमध्ये 90 टक्के पाण्याचा अंश असतो.

Back to top button