तोंडाला ‘आग लावणारे’ आईस्क्रीम! | पुढारी

तोंडाला ‘आग लावणारे’ आईस्क्रीम!

टोकियो : आईस्क्रीमचेही हल्ली अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. मागे एकदा ‘तवा आईस्क्रीम’ नावाच्या भन्नाट प्रकाराचे वृत्त आले होते. ‘न वितळणारे’ही आईस्क्रीम असते. ‘आईस्क्रीम’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जो थंड आणि गोड पदार्थ येतो, त्यापेक्षाही काही वेगळी ‘आईस्क्रीम’ हल्ली येत आहेत. जपानमध्ये तर जहाल तिखट आणि तोंड पोळणारे आईस्क्रीम मिळते!

जपानच्या हिरात या छोट्या गावात अशा प्रकारचे आईस्क्रीम मिळते. तसेच त्या आईस्क्रीमसोबतच एक ‘चॅलेंज’ही असते. या आईस्क्रीमला तोंड लावल्यानंतर ते टाकून देणार्‍या व्यक्तींची संख्या अर्थातच मोठी असते. मात्र, जे लोक हे आईस्क्रीम पूर्णपणे खातात त्यांच्याकडून दुकानदार पैसे घेत नाही. फुकुशिमामधील हिरात नावाचे हे गाव आता अशा वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीममुळे नावारूपास आले आहे. या आईस्क्रीममध्ये ‘हॅबानेरो’ नावाच्या मिरचीची भुकटी वापरली जाते. जगातील सर्वात तिखट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये या मिरचीचा समावेश होतो.

या मिरचीची पूड या कोन आईस्क्रीमवर भुरभुरली जाते. हे तिखट सामान्य नसते व सहजपणे ते खाता येत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडून दुकानदार आधीच लिहून घेतो की हा ग्राहक स्वतःच्या जबाबदारीवरच हे आईस्क्रीम खात आहे. त्सुनामी आणि रेडिएशनच्या धोक्यामुळे फुकुशिमामधील लोकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. अशा वेळी तेथील शेतकर्‍यांनी छोट्या आकराच्या हॅबानेरो मिरच्यांची शेती करण्यास सुरुवात केली होती. 2015 मध्ये या मिरच्यांची पूड सॉफ्ट सर्व्ह आईस्क्रीमसोबत देण्यास सुरुवात झाली आणि हा प्रकार प्रसिद्ध झाला.

Back to top button