अमेरिकेतील अनेक शहरांमध्येही दसरा | पुढारी

अमेरिकेतील अनेक शहरांमध्येही दसरा

वॉशिंग्टन : जगभरात भारतीय सणांची लोकप्रियता वाढत आहे. अमेरिकेत तर अनेक हिंदू सण उत्साहात साजरे केले जातात. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे आपल्याकडे म्हटले जाते. आता ही उक्ती अमेरिकेतही सार्थ होत असताना दिसत आहे. तिथे यावर्षी शंभरपेक्षा अधिक शहरांमध्ये विजयादशमी साजरी होणार आहे. अमेरिकेतील बहुतांश शहरांमध्ये सध्या रामलीला व नवरात्रीही साजरी होत आहे. दसर्‍याला रावणवधाच्या कार्यक्रमाचेही अनेक शहरांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी रावणदहनासाठी भारतातून पुतळे मागवले जात असत. आता अमेरिकेतच असे पुतळे बनू लागले आहेत. अमेरिकेतील निम्म्या राज्यांमध्ये तसेच 40 शहरांमध्ये ऑक्टोबर महिना हा हिंदू संस्कृती-परंपरांचा महिना म्हणून घोषितच करण्यात आला आहे. यावर्षी नवरात्र, दुर्गापूजा, दसरा आणि दिवाळीसारखे सण याच महिन्यात आले आहेत. अमेरिकेतील विकासात हिंदूंचे मोलाचे योगदान असल्याने अनेक राज्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इंडो-एशियन फेस्टिव्हल ग्रुपच्या अध्यक्ष चंचल गुप्ता यांनी सांगितले की अमेरिकेत जन्मलेल्या आमच्या मुला-बाळांची, नव्या पिढीची भारतीय संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी आम्ही अशा सण-उत्सवांचे आयोजन करीत असतो. न्यूजर्सी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दसरा उत्सवासाठी निधी दिला आहे. टेक्सास, ओहायो, न्यूजर्सी, पेनसिल्वानियासारखी शहरे आणि राज्य सरकारांनी दसरा उत्सवासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून दिला आहे.

Back to top button