पॅसिफिक महासागरात नव्या बेटाची निर्मिती | पुढारी

पॅसिफिक महासागरात नव्या बेटाची निर्मिती

न्यूयॉर्क : ‘ज्वालामुखीय’ घटना घडल्यानंतर त्सुनामी, भूकंप तसेच वातावरणात प्रदूषण अशा घटना घडणे ही सामान्य बाब आहे. मात्र, याच महिन्यात पॅसिफिक महासागरात झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटात एका बेटाची निर्मिती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य टोंगा द्विपादरम्यान पॅसिफिक महासागरात शक्तिशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्यातून मोठ्या प्रमाणात लाव्हा, राख आणि अन्य पदार्थ बाहेर पडले. या सर्व पदार्थांनी तेथे एका बेटाची निर्मिती झाली.

होम रिफ सीमाऊंटमध्ये 16 वर्षांनंतर यंदा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या उद्रेकानंतर बेटाची निर्मिती झाली असली तरी ते फार काळ टिकणार नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दहा सप्टेंबर रोजी होम रिफमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात लाव्हा आणि राख तसेच खडक बाहेर पडू लागले. समुद्राच्या पाण्यावर तर मोठ्या प्रमाणात राखेचा थर आणि धुराचे लोट दिसत होते. हळूहळू ज्वालामुखीय पदार्थ चार हजार चौरस मीटर परिसरात पसरले. तसेच पाण्यावर या पदार्थांची उंची दहा मीटरपर्यंत पोहोचली.

टोंगा जियालॉजिकल सर्व्हिसेसच्या अधिकार्‍यांनी 20 सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीचे स्फोट दीर्घकाळ जाणवणार नाहीत; मात्र या बेटाचा आकार आता सहापटीने म्हणजे 24 हजार मीटरपर्यंत वाढला आहे.

Back to top button