कांद्याच्या नियमित सेवनाने मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य, जाणून घ्या अधिक | पुढारी

कांद्याच्या नियमित सेवनाने मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य, जाणून घ्या अधिक

लंडन : जगभरात सध्या कोट्यवधी लोक मधुमेहाने त्रस्त बनले आहेत. एकदा का हा आजार जडला की तो संपुष्टात येण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र, औषधे आणि चांगल्या डायटने हा आजार नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. मधुमेही व्यक्तीच्या शरीरात तयार होणारे इन्सुलिन हे योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. यामुळे ब्लड शुगर वाढू लागते. ‘ब्लड शुगर’ला इन्सुलिनचे इंजेक्शन तसेच अन्य औषधांमुळे नियंत्रित केले जाऊ शकते. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी ब्लड शुगरला नियंत्रित करण्याचा सोपा आणि अत्यंत स्वस्त पर्याय शोधून काढला आहे.

ब्रिटिश वेबसाईट एक्स्प्रेसच्या अहवालानुसार ब्लड शुगरला नियंत्रित करण्यासाठी कांद्याचे सेवन हा एक अत्यंत सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. कांद्याच्या अर्काने ब्लड शुगरला 50 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. संशोधकांच्या मते, कांद्याचा अर्क, एलियम सेपा आणि मेटाफॉर्मिनच्या मदतीने मधुमेहावर बर्‍याच अंशी नियंत्रित केले जाऊ शकते. ही बाब अमेरिकेतील एका सेमिनारमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधपत्रिकेत स्पष्ट करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांनी या संशोधनात मधुमेही उंदरांना 400 व 600 मीलीग्र्रॅम कांद्याचा अर्क दिला. यामुळे उंदराच्या ब्लड शुगर लेवलमध्ये अनुक्रमे 50 व 35 टक्के घट दिसून आली. याशिवाय कांद्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही घटल्याचे दिसून आले.

Back to top button