ह्यूमनॉईड रोबोट करणार मानवी कामे | पुढारी

ह्यूमनॉईड रोबोट करणार मानवी कामे

वॉशिंग्टन : जगात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅलन मस्क हे मंगळावर मानवी वस्ती स्थापन करण्याचे स्वप्न पाहतात. ‘टेस्ला’ व ‘स्पेसएक्स’सारख्या कंपन्या सुरू करणारे मस्क हे नेहमीच तंत्रज्ञानावर आधारित भविष्यावर बोलत असतात. मस्क यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वी एका एआय इव्हेंटमध्ये ह्यूमनॉइड रोबोट ‘ऑप्टीमस’ला लाँच करत जगाला चकित केले.

अब्जाधीश अ‍ॅलन मस्क हे विनाचालक व एआयच्या मदतीने चालणार्‍या कारनंतर एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ह्यूमनॉईड रोबोट प्रोटोटाईपचे स्टेजवर सादरीकरण केले. उल्लेखनीय म्हणजे हा रोबोट स्टेजवर चालतानाच हात हलवून प्रेक्षकांना अभिवादनही करत होता. यावेळी त्याचा एक व्हिडीओही दाखवण्यात आला. यामध्ये रोबोट बॉक्स उचलणे, झाडांना पाणी घालणे अशी माणसांची कामे करताना दिसत होता.

कॅलिफोर्नियातील टेस्ला कंपनीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मस्क यांनी सांगितले की, लवकरच ह्यूमनॉइड रोबोट तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. दरम्यान, मस्क यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या रोबोटच्या योजनेची घोषणा केली आणि आता प्रोटोटाईप सादर केला. या रोबोटचे प्रत्यक्ष उत्पादन पुढील वर्षी सुरू होणार आहे. दरम्यान अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील रोबोटिक्स प्रोफेसर बेन अ‍ॅमोर यांनी सांगितले की, कोणतीही वस्तू अलगदपणे पकडणार्‍या मानवी हातासारखे तंत्रज्ञानी हात तयार करणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे.

Back to top button