ताण-तणावामुळे जोडीदारामधील दोष दिसतात अधिक | पुढारी

ताण-तणावामुळे जोडीदारामधील दोष दिसतात अधिक

नवी दिल्ली : एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की तुम्ही ज्यावेळी तणावात असता त्यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदारामधील चुका किंवा दोष अधिक दिसतात; ताण-तणावात जोडीदाराच्या वाईट सवयी किंवा दोषांकडे अधिक लक्ष केंद्रीत होते. कामाचा ताण किंवा दैनंदिन जीवनातील तणाव तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या नकारात्मक वागणुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यास प्रवृत्त करू शकतो.

ज्यावेळी तुम्ही तणावाखाली असता त्यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराचे छोटे-छोटे दोष मोजू लागता. संशोधनानुसार, ज्यावेळी आपलं एखादं काम नीट होत नाही, आपलं मूल आजारी असतं किंवा तुमची ट्रेन, फ्लाईट चुकते, अशा घटनांमुळे माणसात तणाव निर्माण होतो. अशा घटनांना सामोरे जावे लागते तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा तुमच्या जोडीदाराला दोष देऊ लागता.

तणावाचा अनुभव घेतल्याने आपण आपल्या जोडीदाराच्या नकारात्मक वागणुकीकडे लक्ष केंद्रीत करून त्याच्यावर राग काढतो. ऑस्टिन येथील टेक्सास युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 79 नवविवाहित जोडप्यांची पाहणी करून याबाबतचे निष्कर्ष काढले. अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. लिसा नेफ यांनी सांगितले की तणावामुळे जोडप्याचे लक्ष त्यांच्या जोडीदाराच्या गैरवर्तनाकडे वळले तर त्याचा परिणाम नातेसंबंधावर होण्याची शक्यता असते.

Back to top button