इंडोनेशियात आढळले सर्वात मोठे फूल | पुढारी

इंडोनेशियात आढळले सर्वात मोठे फूल

जकार्ता : अनेक लोकांना जंगलात ट्रेकिंग करण्याची आवड असते. त्यामधून निसर्गाच्या सान्निध्याचा आणि जैवविविधता पाहण्याचा आनंद मिळतो. इंडोनेशियामध्ये एक व्यक्ती जंगलात असेच ट्रेकिंग करीत असताना त्याला एका ठिकाणी दुर्लभ फूल दिसून आले. त्याने याबाबत माहिती घेतल्यावर त्याला समजले की हे ‘रॅफलेसिया अर्नोल्डी’ नावाचे फूल असून त्याची ओळख ‘जगातील सर्वात मोठे फूल’अशी आहे. अर्थात हे महाकाय फूल सुगंधी नसून अत्यंत दुर्गंधी असते!

इंडोनेशियाच्या वर्षावनात त्याला हे फूल उमललेले दिसून आले. हे फूल तीन फुटांपर्यंतही वाढू शकते व त्याचे वजन 15 पौंडही असू शकते. त्याचा रंग लाल-गुलाबी असतो व ते पूर्णपणे उमलते. सफेद डाग असलेल्या त्याच्या पाकळ्या आकर्षक असतात. चार दिवसांमध्ये या फुलाची कळी पूर्णपणे उमलते. या फुलाचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. तो पाहून अनेक यूजर्सनी त्याच्याविषयीचे आश्चर्य व कुतुहल व्यक्त केले. त्याचा व्हिडीओ आतापर्यंत 36 हजारांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. हे फूल दिसण्यात सुंदर व भव्य असले तरी त्याला सडलेल्या मृतदेहासारखी दुर्गंधी येते. इंग्रजीत या फुलाला अशा कारणामुळेच ‘कॉर्प्स फ्लॉवर’ असे म्हटले जाते. त्यामुळे ‘दूरून डोंगर साजरे’ अशा पद्धतीनेच त्याला पाहिले जाते!

Back to top button