अमेरिकेत 68 टक्के लोकांना अनिद्रेची समस्या | पुढारी

अमेरिकेत 68 टक्के लोकांना अनिद्रेची समस्या

वॉशिंग्टन : कोरोना महामारीनंतर आता महागाईमुळे अमेरिकन नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच पाचपैकी एक अमेरिकन माणूस रात्री सुखाची झोप घेऊ शकत नाही. हा खुलासा ओहायो युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरच्या पाहणीतून करण्यात आला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की लोक इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तणावातून जात आहेत. अमेरिकेत 68 टक्के लोकांना तणावामुळे झोपेची समस्या निर्माण झाली आहे.

इंटर्नल मेडिसिनच्या प्राध्यापिका डॉ. अनीसा दास यांच्या माहितीनुसार 2018 ते 2021 दरम्यान झोप न येण्याच्या समस्येत 29 टक्के वाढ झाली आहे. तणावामुळे हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे रक्तदाब आणि स्नायूंमधील तणावाची स्थितीही निर्माण होते. अशा स्थितीत लोकांना झोप येत नाही. त्यामुळे अन्यही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अमेरिकन लोक रात्री सरासरी केवळ पाच तासच झोप घेतात. तसेच आठवड्यातून किमान तीन दिवस झोप न येण्याच्या समस्येशी झुंजतात.

अमेरिकेतील केवळ आठ टक्के लोकांनाच असे वाटते त्यांना चांगली झोप व विश्रांती मिळालेली आहे. 50 टक्के लोक झोपण्यापूर्वी मोबाईल पाहत बसतात तर 37 टक्के लोक टी.व्ही. पाहत झोपतात. फोन किंवा टी.व्ही.च्या प्रकाशामुळे आपल्या शरीरातील जैविक घड्याळाची दिशाभूल होते व योग्यवेळी झोप येत नाही, असे डॉ. दास यांनी सांगितले.

Back to top button