सर्वात खराब शौचालय शोधण्यासाठी फिरला 90 देश! | पुढारी

सर्वात खराब शौचालय शोधण्यासाठी फिरला 90 देश!

लंडन : शीर्षक वाचल्यावर अनेकांची प्रतिक्रिया ‘कुणाचं काय तर कुणाचं काय!’ अशीच येऊ शकते. मात्र, जगाच्या पाठीवर अशी काही माणसं असतात. एका ब्रिटिश ब्लॉगरने जगातील सर्वात खराब सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी 90 देशांचा एकूण 1.2 लाख किलोमीटरचा प्रवास केला. यासाठी त्याने सुमारे 1.3 कोटी रुपये खर्च केले. शेवटी त्याला एका देशात सर्वात खराब शौचालय दिसलेच!

या ब्लॉगरचे नाव आहे ग्रॅहम. लोक सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी जगप्रवास करीत असतात. काही लोक धार्मिक, सामाजिक कारणांसाठीही जगभर फिरतात. मात्र, हा माणूस सर्वात घाणेरडे सार्वजनिक शौचालय कुठे आहे हे शोधण्यासाठी जगभर फिरत होता. त्यासाठी त्याने 1,50,000 पौंड म्हणजेच सुमारे 1.3 कोटी रुपयेही खर्च केले. अखेर त्याला ताजिकिस्तानात जगातील सर्वात खराब शौचालय सापडले. ते किती घाणेरडे आहे याचे त्याने वर्णन करूनही सांगितले आहे जे ऐकण्याची कुणाचीही इच्छा होणार नाही! हे घाणेरडे शौचालय शोधण्यापूर्वी त्याने सहा खंडांमधील शेकडो सार्वजनिक शौचालये पाहिली होती.

त्यावर त्याने ‘टॉयलेटस् ऑफ द वाईल्ड फ्रंटियर’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकात निवडक 36 शौचालयांची माहिती देण्यात आली असून त्यामध्ये बांगलादेश आणि चीनमधीलही प्रत्येकी एका शौचालयाची माहिती आहे. हा शोध घेण्याची कल्पना त्याला मोरोक्कोमध्ये आपल्या पहिल्याच परदेश प्रवासावेळी सूचली होती.

Back to top button