भारताबाहेरही आहेत देवीची शक्तिपीठे | पुढारी

भारताबाहेरही आहेत देवीची शक्तिपीठे

नवी दिल्ली : सोमवारपासून देश-विदेशात नवरात्रौत्सवास भक्तिभावाने व उत्साहात प्रारंभ झाला. ठिकठिकाणी शारदीय नवरात्रीनिमित्त देवीची आराधना सुरू झाली, त्यामध्येही देवीच्या शक्तिपीठांचा खास समावेश आहे. असे मानले जाते की जगाच्या पाठीवर देवीची 51 शक्तिपीठे आहेत. दक्ष प्रजापतीच्या यज्ञात भगवान शिवशंकराचा अपमान झाल्याने शिवपत्नी व दक्षाची कन्या सतीने प्राणत्याग केले.

त्यानंतर या यज्ञाचा विध्वंस झाला आणि सतीचे शव खांद्यावर घेऊन शिवाने तांडव सुरू केले. त्यावेळी शिवाचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र सोडून सतीच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले व देवीची शक्तिपीठे निर्माण झाली. कालांतराने हीच सती हिमालयाची कन्या पार्वती रूपाने जन्मली व तिने पुन्हा शंकराशीच विवाह केला.

भारतातील अनेक शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. मात्र, फाळणीनंतर वेगळ्या झालेल्या पाकिस्तान व बांगलादेशातही अनेक शक्तिपीठे आहेत. अगदी श्रीलंकेतही शक्तिपीठ पाहायला मिळते. भारताबाहेर सर्वाधिक शक्तिपीठे बांगलादेशात आहेत. बंगालची भूमी ही प्राचीन काळापासूनच देवीभक्तांची, शक्तिपूजकांची राहिलेली आहे. बांगलादेशातील शक्तिपीठांमध्ये सुगंधादेवी शक्तिपीठ (शिकारपूर), चट्टल भवानी शक्तिपीठ (चिट्टागांग), यशोरश्वेरी शक्तिपीठ (ईश्वरीपूर) आणि करतोयाघाट शक्तिपीठ (भवानीपूर) यांचा समावेश होतो. बांगलादेशची राजधानी ढाका येथील ढाकेश्वरी देवीचे मंदिरही प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे. या मंदिराला तिथे ‘राष्ट्रीय मंदिरा’चा (नॅशनल टेम्पल) दर्जा आहे.

नेपाळमध्ये दोन शक्तिपीठे आहेत. त्यामध्ये मुक्तिधाम मंदिर (पोखरा) आणि गुहेश्वरी शक्तिपीठ (काठमांडू) यांचा समावेश आहे. श्रीलंका आणि तिबेटमध्ये प्रत्येकी एक शक्तिपीठ आहे. श्रीलंकेच्या त्रिकोणमाली येथे इंद्राक्षी शक्तिपीठ व तिबेटमध्ये मानस शक्तिपीठ आहे. पाकिस्तानात जगप्रसिद्ध हिंगलाज देवीचे शक्तिपीठ आहे. हिंगोल नदीजवळ चंद्रकूप पर्वतावरील गुहेत हे शक्तिपीठ आहे. याठिकाणी माता सतीचे शीर गळून पडले होते असे मानले जाते.

Back to top button