आता इलेक्ट्रिक विमानांचेही येणार दिवस! | पुढारी

आता इलेक्ट्रिक विमानांचेही येणार दिवस!

न्यूयॉर्क : सौर ऊर्जेवर चालणार्‍या एका मोठ्या विमानाने दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचीही चाचणी यशस्वी करून दाखवली होती. आता भविष्यात जमिनीवरील विजेवर चालणार्‍या वाहनांप्रमाणेच इलेक्ट्रिक विमानेही पाहायला मिळतील. किमान छोट्या विमानांबाबत तर हे निश्चितच घडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टू-सीटर वेलिस इलेक्ट्रोस हे विमान यापूर्वीच युरोपच्या चारही दिशांनी चुपचाप उड्डाण करीत आहे. ब्रिटिश कोलंबियामध्ये इलेक्ट्रिक सीप्लेन्सचे परीक्षण सुरू आहे आणि अशी मोठी विमानेही येऊ घातली आहेत.

एअर कॅनडाने 15 सप्टेंबरला एक घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनी स्वीडनच्या हार्ट एअरोस्पेसकडून 30 इलेक्ट्रिक-हायब्रीड क्षेत्रीय विमाने खरेदी करणार आहे. 2028 पर्यंत अशी तीस सीटची प्रवासी विमाने सुरू करण्यात येतील. यूएस नॅशनल रिन्यूएबल एनर्जी लॅबच्या विश्लेषकांनी म्हटले आहे की, यानंतर 50 ते 70 सीट असलेले पहिले हायब्रीड इलेक्ट्रिक कॉम्प्युटर प्लेन तयार करण्यात अधिक वेळ लागणार नाही.

2030 च्या दशकात वीजेवर चालणारी विमाने ही एक सामान्य घटना बनेल. सध्या जगभरात कार्बन उत्सर्जनाबाबत चिंता निर्माण झालेली आहे. वैश्विक उत्सर्जनातील सुमारे तीन टक्के हिस्सा उड्डयन क्षेत्रातील आहे. ‘कोव्हिड-19’ महामारीच्या आधीच्या तुलनेत 2050 पर्यंत तीन ते पाच पट अधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचे हे कारण बनू शकेल. त्यामुळे स्वच्छ ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे; मात्र विमानांचे विद्युतीकरण करण्यामागे सर्वात मोठी समस्या बॅटरीचे वजन हे आहे. केवळ एका तासाचे उड्डाण करण्यासाठी ‘737’ मधील सर्व प्रवासी आणि माल बाहेर काढून ती जागा बॅटरीने भरावी लागेल.

1 पौंड जेट इंधनाच्या बदली 50 पौंड बॅटरी लागेल. या समस्येवर उपाय शोधताना आपल्याला एक तर लिथियम-आयन बॅटरीला हलके बनवावे लागेल किंवा नव्या प्रकारची बॅटरी विकसित करावी लागेल. सध्या नवी बॅटरी विकसित केली जात आहे; पण ती विमानासाठी तयार नाही. ‘737’चे पूर्णपणे विद्युतीकरण होणे शक्य नसले, तरी हायब्रीड प्रॉपल्शन सिस्टिमचा वापर करून मोठ्या जेटमध्ये बॅटरीने काही ऊर्जा मिळवणे शक्य आहे. नेहमीचे इंधन व वीज अशा दोन्हीचा वापर जसा हायब्रीड वाहनांमध्ये केला जातो तसाच हा प्रकार आहे.

Back to top button