‘भविष्यातून आलेला’डोरेमॉन आहे 54 वर्षांचा!

‘भविष्यातून आलेला’डोरेमॉन आहे 54 वर्षांचा!
Published on
Updated on

टोकियो : मिकी माऊस, डोनाल्ड डक, प्लुटो असोत किंवा टॉम आणि जेरी असोत, 'मोगली' असो किंवा आपल्याकडील 'छोटा भीम', या सर्व कार्टून व्यक्‍तिरेखा मुलांच्या भावविश्‍वात ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यामध्येच जपानी कार्टून मालिकांमधीलही अनेक व्यक्‍तिरेखांची आता भर पडलेली आहे. जपान्यांना रोबो आणि मांजर या दोन्हीचे मोठेच आकर्षण. त्यामधूनच मांजराच्या रूपातील 'डोरेमॉन' या रोबोची व्यक्‍तिरेखा निर्माण झाली व ती लोकप्रियही झाली.

डोरेमॉनचा जन्म 2112 मध्ये होणार असल्याचे मालिकेत दाखवले जाते. हा भविष्यातील रोबो 'नोबिता' नावाच्या मुलास मदत करण्यासाठी येतो. वास्तवात डोरेमॉन या व्यक्‍तिरेखेची निर्मिती 1969 मध्ये झाली. हा चिमुकला पण अष्टावधानी डोरेमॉन 54 वर्षांचा झाला आहे! 3 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस असतो. विशेष म्हणजे 2012 मध्ये जपानी सरकारने त्याच्या जन्माआधीच शंभर वर्षे त्याचा वाढदिवस साजरा केला!

'डोरेमॉन' हा केवळ टी.व्ही.पुरताच मर्यादित नाही. या फ्रँचायझीमध्ये आतापर्यंत 41 फिचर फिल्म्स, 2 स्पेशल फिल्म्स, 15 शॉर्ट फिल्म्स झालेल्या आहेत. डोरेमॉनची मजेशीर कथा दाखवणार्‍या एका कॉमिक बुकपासून त्याची सुरुवात झाली. लेखक फुजिको एफ. फुजिओ यांनी तयार केलेले हे जपानी काल्पनिक पात्र आहे. फुजिको यांना मांगा मासिकासाठी (जपानचे ग्राफिकल कॉमिक) काही तरी नवे करायचे होते. ते नवीन कल्पनेच्या शोधात होते आणि त्यामधूनच त्यांना वाटले की त्यांच्याकडे एखादे मशिन असावे जे त्यांच्या सर्व अडचणी दूर करू शकेल. हा विचार करीत असतानाच ते त्यांच्या मुलीच्या खेळण्यावर पाय पडून खाली कोसळले आणि शेजारीच मांजरांच्या भांडणाचा आवाज ऐकू आला.

या तीन घटना एकत्र होऊन त्यांना प्रगत गॅझेटस् असलेल्या मांजराचे पात्र साकारण्याची कल्पना सुचली. 'डोरेमॉन'हे एक मिश्र नाव आहे. तिथे 'डोरा' म्हणजे 'भटका' आणि 'इमॉन' हे जपानी पुरुषी नाव आहे. त्याचा अर्थ 'भटका माणूस'. डोरेमॉनवर आधारित चित्रपटांनी आतापर्यंत जगभरात 13 हजार कोटींची कमाई केली आहे. रॉयल्टीतून त्याची कमाई 33 हजार कोटी म्हणजेच एकूण 46 हजार कोटी आहे. 'डोरेमॉन' भारतातील 48 कोटी लोक पाहतात व त्यामध्ये मुले आणि प्रौढांचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news