आफ्रिकेतील सर्वात प्राचीन डायनासोर जीवाश्माचा शोध | पुढारी

आफ्रिकेतील सर्वात प्राचीन डायनासोर जीवाश्माचा शोध

हरारे : आफ्रिकेतील झिम्बाब्वे या देशात 23 कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे. दोन पायांवर चालणार्‍या या विशालकाय डायनासोरचे दात अत्यंत तीक्ष्ण होते व मान, शेपूट लांब होती. हा आफ्रिका खंडात वावरणारा सर्वात प्राचीन डायनासोर ठरला आहे.

या डायनासोरला ‘बायरेसॉरस राठी’ असे नाव आहे व तो सुमारे 6 फूट लांबीचा होता. त्याच्या जीवाश्मामुळे या डायनासोरबाबतच्या माहितीवर नवा प्रकाश पडू शकतो. व्हर्जिनिया टेक कॉलेज ऑफ सायन्सचे डॉ. ख्रिस्तोफर ग्रीफिन यांनी सांगितले की या जीवाश्माच्या शोधामुळे महत्त्वाच्या भौगोलिक अंतराला भरून काढले जाऊ शकेल. हा निश्‍चितपणे आफ्रिकेतील सर्वात प्राचीन डायनासोर आहे. जगाच्या अन्य भागात अशा प्रकारचे डायनासोर ज्यावेळी वावरत होते, त्याचवेळी हा डायनासोरही आफ्रिकेत होता.

सर्वात प्राचीन डायनासोर ट्रिआसिक युगातील कार्नियन काळात सुमारे 23 कोटी वर्षांपूर्वी वावरत होते. त्यांचे जीवाश्म मिळणे हे अत्यंत दुर्लभ आहे. सर्वात प्राचीन डायनासोरचे जीवाश्म जगभरात प्रामुख्याने अर्जेंटिना, दक्षिण ब्राझील व भारतात आढळत होते. आता आफ्रिकेत जे जीवाश्म सापडले आहे त्या डायनासोरच्या कवटीचा काही भाग व हाताचा काही भाग नाही. हा डायनासोर दोन पायांवर उभा राहत असे व त्याचे डोके तुलनेने लहान आकाराचे होते. त्याचे दात छोटे पण अतिशय तीक्ष्ण होते.

Back to top button