युरिक अ‍ॅसिड आणि संधिवाताचा काय आहे संबंध? | पुढारी

युरिक अ‍ॅसिड आणि संधिवाताचा काय आहे संबंध?

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढणे शरीरासाठी हानिकारक असते त्याचप्रमाणे युरिक अ‍ॅसिड वाढणेही हानिकारक ठरते. रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या उच्चस्तराला ‘हायपरयुरिसेमिया’ असे म्हटले जाते.

ज्यावेळी शरीरात युरिक अ‍ॅसिडच्या निर्मितीत वाढ होते किंवा मूत्रपिंडाच्या माध्यमातून त्याचे कमी उत्सर्जन होते, त्यावेळी शरीरात युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढू शकतो. संधिवात व अन्य समस्या निर्माण होण्याबाबत हे धोकादायक ठरते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

युरिक अ‍ॅसिड चे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामध्ये मूतखडा, मूत्रपिंड खराब होणे यासारख्या समस्यांचाही समावेश आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हाय युरिक अ‍ॅसिड हे ‘गाऊट’चा धोकाही वाढवते.

‘गाऊट’ हा एकप्रकारचा अर्थरायटिस म्हणजेच संधिवात असतो. त्यामध्ये युरिक अ‍ॅसिड स्फटिके किंवा खडे सांध्यांमध्ये जमा होतात. या आजारात रुग्णाला आपल्या आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. काही गोष्टींचे सेवन टाळणे हितावह ठरते. मद्यपानामुळे युरिक अ‍ॅसिडचा स्तर घटण्याऐवजी आणखी वाढतो व त्यामुळे मद्यपान करू नये.

हाय फ्रुक्टोस कॉर्न किंवा ग्लुकोज फ्रुक्टोसमुळेही युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढतो. त्यामुळे अशा पदार्थांपासूनही दूर राहणे गरजेचे असते. अधिक चरबीयुक्त आहार घेऊ नये. कारण, त्यामुळे युरिक अ‍ॅसिड शरीराबाहेर टाकण्यास अडथळा येतो. रिफाईन कार्बोहायड्रेटपासून बनलेला आहार म्हणजेच व्हाईट ब्रेड, केक आणि कँडीज्चेही सेवन करू नये. तसेच प्युरीन नावाचा प्रोटिनयुक्त आहारही घेऊ नये. त्यामध्ये मटण, चिकन, मासे, मशरूम, बीन्स यांचा समावेश असतो.

उच्च युरिक अ‍ॅसिडची समस्या असलेल्या लोकांनी हे पदार्थ कमी खावेत किंवा अजिबातच खाऊ नयेत. फायबरयुक्त आहार अशा लोकांना लाभदायक ठरतो. धान्य, सफरचंद, संत्री, स्ट्रॉबेरी आदींमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. कमी फॅटचे दूधही घ्यावे; कारण असे दूध युरिक अ‍ॅसिडला कमी करते व संधिवाताचा धोकाही घटवते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

Back to top button