
नवी दिल्ली ः मधुमेहाच्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. तज्ज्ञांनी काही पदार्थ खाणे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते असे म्हटले आहे.
अनेकांना दुधामध्ये चॉकलेट सिरप मिसळून पिणे आवडते. मात्र, ही सवय मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोक्याची ठरू शकते. चॉकलेट मिल्कमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यापासून दूर राहणे गरजेचे ठरते. दही हे आरोग्यासाठी लाभदायक असले तरी हल्ली बाजारात चवीच्या दह्याची मागणी वाढली आहे. हे दही रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवते. कॉफीमध्ये कॅफिन हा घटक असतो व तो रक्तदाबही वाढवू शकतो.
काहींना चवीची कॉफी पिणे आवडते; पण त्यामध्ये छुपी साखर असते जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे. आंबा व अननससारख्या काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे ग्लुकोजचे प्रमाण वाढते. अनेकांना कोणत्याही पदार्थावर टोमॅटो सॉस टाकून खाण्याची सवय असते. त्यामध्येही साखरेचे प्रमाण अधिक असते व रक्तातील साखर वाढू शकते.