कोणत्या प्राण्याचा मेंदू असतो शरीराच्या तुलनेत मोठा? | पुढारी

कोणत्या प्राण्याचा मेंदू असतो शरीराच्या तुलनेत मोठा?

वॉशिंग्टन ः प्राण्यांचा मेंदू हा निसर्गाची एक अत्यंत जटील व प्रभावी अशी रचना आहे. प्रत्येक प्राण्याच्या मेंदूचा आकार वेगवेगळा असतो. मात्र, त्याच्या शरीराच्या तुलनेशी तो निगडीत असतो. सर्वात मोठा मेंदू असतो स्पर्म व्हेल या माशाचा. त्याच्या मेंदूचे वजन तब्बल 8 किलो असते. अर्थातच इतका मोठा मेंदू त्याच्या अवाढव्य देहाला साजेसाच असतो. या माशाचे वजन 45 टन असते व त्या प्रमाणातच त्याचा हा मेंदू असतो. हे प्रमाण 1 ः 5,100 असे आहे. मात्र, असा कोणता जीव आहे ज्याचा मेंदू त्याच्या शरीराच्या तुलनेत मोठा असतो? एका विशिष्ट प्रकारच्या मुंगीचा मेंदू असा मोठा असतो!

‘ब—ेन, बिहेवियर अँड इव्होल्युशन’ नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार मुंगीची अतिशय लहान आकाराची प्रजाती ‘ब—ॅचीमिरमेक्स’चा मेंदू तिच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तिच्या शरीराचे सरासरी वजन 0.049 मिलीग्रॅम असते व तिच्या मेंदूचे सरासरी वजन 0.006 मिलीग्रॅम असते. हे प्रमाण 1ः8 असे आहे. कोणत्याही प्राण्याच्या मेंदूचा आकार हा त्या प्राण्याच्या देहाच्या आकारानुसार वाढत असतो. एखाद्या प्राण्याच्या गुंतागुंतीच्या वर्तनावरही मेंदूचा आकार अवलंबून असतो.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील सोफी स्कॉट या संशोधिकेने सांगितले की मोठे शरीर म्हणजे ते नियंत्रित ठेवण्यासाठी हवी असलेली मोठी क्षमता. मात्र, मेंदूचा आकार हा नेहमीच संबंधित प्राण्याच्या बुद्धिमत्तेशीही निगडीत असतो असे नाही. आफ्रिकन हत्तीचा मेंदू हा सरासरी 4.6 किलो वजनाचा म्हणजेच मानवी मेंदूपेक्षा तिप्पट मोठा असतो. हत्तीचा इतका मोठा मेंदू विशेषतः त्यांची सोंड आणि कानातील स्नायूंच्या हालचालींमध्ये समन्वय ठेवण्यासाठी असतो.

संबंधित बातम्या
Back to top button