
न्यूयॉर्क : आर्क्टिक वर्तुळात संशोधकांना माशांची एक अनोखी प्रजाती आढळून आली आहे. या माशांचे डोळे रेडियमसारखे चकाकतात. आर्क्टिकमध्ये बर्फाच्या थराखाली असलेल्या पाण्यात हे मासे आढळतात. या माशांच्या रक्तात 'अँटी फ्रीझ प्रोटिन' असते. त्यामुळे हे मासे थंडीने गोठून जात नाहीत व त्यांना चमकदार हिरवा रंग मिळतो.
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील संशोधक आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या बारुच कॉलेजमधील डेव्हीड ग्रुबर यांनी याबाबतचे संशोधन केले. या माशांना 'स्नेलफिश' असे नाव आहे. बर्फाळ पाण्यात माशांची ही अनोखी प्रजाती आढळते. अतिशीत वातावरणात तग धरून राहण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्यामध्ये असते. ही क्षमता त्यांना अँटी फ्रीझ प्रोटिनमुळे मिळते. उत्तर व दक्षिण ध्रुवावरील माशांनी उत्क्रांतीच्या टप्प्यात आपल्या शरीरात हे विशिष्ट प्रोटिन विकसित केलेले आहे.
ग्रीनलँडमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले. सागरी जलचरांमध्ये काळानुरूप असे परिवर्तन घडत आलेले आहे. आर्क्टिकसारख्या अतिथंड भागात आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या माशांमध्ये हे खास बदल झाल्याचे दिसून येते.