पिझ्झा पार्टी अंतराळात रंगली | पुढारी

पिझ्झा पार्टी अंतराळात रंगली

न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकार शून्य गुरुत्वाकर्षणामुळे होणार्‍या गंमती-जंमती नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. या स्थानकावरील अनेक व्हिडीओ तेथील अंतराळवीर शेअर करतात. आता तेथील पिझ्झा पार्टी चाही व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. हवेत तरंगणारे हे पिझ्झा पाहून अनेकांच्या तोंडात बोटे गेली!

याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तेथे सध्या राहत असलेल्या अंतराळवीरांची टीम ही पिझ्झा पार्टी करीत होती. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या या अंतराळ स्थानकावर हे अंतराळवीर हवेत तरंगणार्‍या पिझ्झावर टॉपिंग्ज करण्याचा प्रयत्न करीत होते.

हा व्हिडीओ थॉमस पेस्केट यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मित्रांसमवेत फ्लोटिंग पिझ्झा नाईट, हे चित्र पृथ्वीवरील शनिवार-रविवारी होणार्‍या वीकेंड पार्टीसारखेच दिसेल. असे म्हटले जाते की एक चांगला शेफ त्याच्या पाककृतींचे रहस्य कधीही उघड करीत नाही.

मात्र, मी एक व्हिडीओ बनवला आहे जेणेकरून आपण ही ‘पिझ्झाकृती’ पाहू आणि समजू शकाल!’ सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये थॉमस आपल्या मित्रांसमवेत शून्य गुरुत्वाकर्षणात पिझ्झा बनवण्याचा आणि खाण्याचा आनंद घेत असताना दिसतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ सात लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. त्याला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Back to top button