‘या’ पाच औषधांनी बदलले मानवी जीवन | पुढारी

‘या’ पाच औषधांनी बदलले मानवी जीवन

सध्या मानवाचे जीवन पूर्वीच्या तुलनेत अधिक सुकर व सुरक्षितही झालेले आहे. माणसाचे आयुर्मानही वाढले आहे व त्याचे श्रेय अनेक प्रकारच्या औषधांना जाते.

या औषधांनी माणसाच्या आरोग्याला सुरक्षित ठेवले तसेच त्याला वेदनेतून मुक्तही केले. मानवी जीवन बदलून टाकणार्‍या अशा पाच औषधांची ही माहिती…

अ‍ॅनेस्थिसिया

इसवी सन 1700 च्या दशकाच्या अखेरीस ब्रिटिश केमिस्ट जोसेफ प्रीस्टली यांनी एक गॅस बनवला ज्याला त्यांनी ‘फ्लॉजिस्टिकेटेड नायट्रस एअर’ (नायट्रस ऑक्साईड) असे नाव दिले. अन्य एक ब्रिटिश केमिस्ट हम्फ्री डेवी यांनी त्याचा वापर शस्त्रक्रियेवेळी वेदनाशामक म्हणून केला जाऊ शकतो असा विचार केला. सन 1834 मध्ये फ्रेंच केमिस्ट जीन-बॅप्टिस्ट डुमास यांनी एका नव्या गॅसला क्लोरोफॉर्मचे नाव दिले. स्कॉटिश डॉक्टर जेम्स यंग सिम्पसन यांनी सन 1847 मध्ये प्रसूतीदरम्यान मदत म्हणून त्याचा वापर केला. लवकरच शस्त्रक्रियेवेळी अ‍ॅनेस्थिसियाचा अधिक व्यापक स्वरुपात वापर होऊ लागला. अ‍ॅनेस्थिसियाच्या आधी अनेक रुग्ण शस्त्रक्रियेवेळी वेदनेनेच मृत्युमुखी पडत असत.

पेनिसिलिन

सन 1928 मध्ये स्कॉटिश चिकित्सक अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याबाबतीत जे घडले त्यामुळे अपघातानेच एक नवा महत्त्वाचा शोध लागला. फ्लेमिंग आपल्या प्रयोगशाळेत जीवाणू स्ट्रेप्टोकोकसच्या काही कल्चरला सोडून सुट्टीवर गेले होते. ज्यावेळी ते परत आले त्यावेळी त्यांना आढळले की काही वायूजनित पेनिसिलिनने (एक कवक संदूषक) स्ट्रेप्टोकोकसची वाढ रोखली होती. ऑस्ट्रेलियन रोग वैज्ञानिक हॉवर्ड फ्लोरे आणि त्यांच्या टीमने पेनिसिलिनला स्थिर केले आणि पहिला मानव प्रयोग केला. अमेरिकन फंडिंगमुळे पेनिसिलिनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले व त्यामुळे दुसर्‍या महायुद्धावेळी अनेक रुग्णांच्या उपचारावेळी त्याचा वापर झाला.

नायट्रोग्लिसरीन

सन 1847 मध्ये नायट्रोग्लिसरीनचा शोध लावण्यात आला. ते एन्झायना, हृदयरोगाशी निगडित छातीच्या वेदनेवर उपचार करणारे पहिले आधुनिक औषध ठरले. त्याच्या संपर्कात येणार्‍या कारखान्यांमधील मजुरांना डोकेदुखी व चेहर्‍यावर लाली येण्याची समस्या निर्माण झाली. याचे कारण म्हणजे नायट्रोग्लिसरीन एक वॅसोडिलेटर आहे. ते रक्तवाहिन्यांना फैलावते. लंडनमधील डॉक्टर विल्यम मुरेल यांनी स्वतःवर नायट्रोग्लिसरीनचा प्रयोग केला आणि त्यानंतर आपल्या एन्झायनाच्या रुग्णांवर ते आजमावून पाहिले. त्यांना तत्काळ लाभ झाल्याचे दिसून आले. या शोधाने रक्तदाब कमी करणार्‍या औषधांचा तसेच बीटा-ब्लॉकर्स व स्टॅटिनसारख्या औषधांचाही मार्ग प्रशस्त केला.

गर्भनिरोधक गोळी

सन 1951 मध्ये अमेरिकन जन्म नियंत्रण अधिवक्ता मार्गारेट सेंगर यांनी संशोधक ग्रेगरी पिंकस यांना उत्तराधिकारी कॅथरीन मॅककॉर्मिक यांच्या फंडातून एक प्रभावी हार्मोनल गर्भनिरोधक विकसित करण्यास सांगितले. प्रोजेस्टेरोनने ओव्यूलेशनला रोखण्यास मदत केल्याचे पिंकस यांना संशोधनात आढळले. त्यामधून त्यांनी एक परीक्षण गोळी विकसित केली. तिची विशेषतः प्युर्तो रिकोमधील महिलांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली. या नव्या औषधाला जी डी सर्ले आणि कंपनीद्वारे 1960 मध्ये अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली.

डायजेपाम

पहिले बेंजोडायजेपाइन हे 1955 मध्ये बनवण्यात आले होते व ‘हॉफमॅन-ला रोश’ कंपनीद्वारे एक लिब्रियमच्या रूपाने त्याचे विपणन करण्यात आले. पोलिश-अमेरिकन केमिस्ट लियो स्टर्नबॅक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 1959 मध्ये लिबि—यमला रासायनिक रूपात बदलले ज्यामुळे एका अधिक शक्तिशाली औषधाचे उत्पादन झाले. हे डायजेपाम होते ज्याचे 1963 मध्ये वॅलियमच्या रुपात विपणन करण्यात आले. या औषधाने एंग्झायटी, नैराश्य यासारख्या मानसिक आजारांवरील उपचार सुलभ झाले व आधुनिक अँटीडिप्रेसंट्स औषधांचा मार्गही प्रशस्त झाला.

Back to top button