‘जादूची’ नव्हे, ‘हड्डी तोड झप्पी’! | पुढारी

‘जादूची’ नव्हे, ‘हड्डी तोड झप्पी’!

बीजिंग : ‘जादू की झप्पी’ ही एखाद्याला दिलासा देण्यासाठी गुणकारी ठरते, पण कधी कधी काही लोक भलतेच घट्ट आलिंगन देत असतात. युध्दसमाप्तीनंतर धृतराष्ट्राने भीमाच्या पुतळ्याला मोठ्या आवेशाने आलिंगन दिले व हा लोखंडी पुतळाही चक्काचूर झाला, असे महाभारतात वर्णन आहे. अनेकांचे आलिंगन अशा थाटाचेच असते व त्याचा त्रास भोगलेली माणसंही आहेत. चीनमधील एका महिलेस तिच्या एका सहकार्‍याने असेच आलिंगन दिले आणि तिच्या बरगडीची तीन हाडे मोडली!

ही महिला चीनच्या हुनान प्रांताच्या युयांग शहरातील आहे. ती ऑफिसमध्ये चॅटिंग करीत असताना अचानक तिचा एक सहकारी तिच्याजवळ आला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. ही मिठी इतकी घट्ट होती की ती वेदनेने कळवळू लागली. आफिसमधून बाहेर पडल्यावरही तिच्या छातीत वेदना होत होत्या. मात्र तिने हॉस्पिटलमध्ये जाणे टाळून घरगुती उपाय केले.

पाच दिवसांनंतरही वेदना कमी न झाल्याने ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे एक्स-रे काढल्यावर तिच्या तीन बरगड्यांना दुखापत झाल्याचे दिसून आले. तिने आपल्या सहकार्‍याविरुद्ध कोर्टात धाव घेतली व न्यायालयाने तिला 10 हजार युआन म्हणजेच सुमारे 1.16 लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश तिच्या सहकार्‍याला दिला.

Back to top button