कोरोनानंतर चेतासंस्थेच्या आजारांचा धोका अधिक | पुढारी

कोरोनानंतर चेतासंस्थेच्या आजारांचा धोका अधिक

लंडन : जगभरात सध्या कोरोना महामारी आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, महामारीच्या काळात ज्या लोकांना गंभीर स्वरूपात कोरोना होऊन गेलेला आहे त्यांना ‘लाँग कोव्हिड’सह अन्यही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा लोकांना न्यूरॉलॉजिकल म्हणजेच चेतासंस्थेशी संबंधित तसेच मानसिक आरोग्याशी निगडीत काही आजार होण्याचा धोका दोन वर्षांपर्यंत अधिक असतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘द लॅन्सेट सायकिअ‍ॅट्री’ या वैद्यकीय नियतकालिकात देण्यात आली आहे. ‘कोव्हिड-19’ होऊन गेलेल्या सुमारे साडेबारा लाखांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याबाबतच्या नोंदींचे विश्लेषण करून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

श्वसनमार्गाच्या अन्य कोणत्याही संसर्गाच्या तुलनेत ‘कोव्हिड-19’चा संसर्ग होऊन गेलेल्या लोकांना पुढील दोन वर्षांपर्यंत सायकॉसिस, डिमेन्शिया, ब—ेन फॉग यासारखे चेतासंस्थेशी तसेच मानसिक आरोग्याशी निगडीत आजार होण्याचा मोठा धोका असतो असे आढळले. ‘कोव्हिड-19’ च्या सुरुवातीपासूनच संबंधित रुग्णांना अशा आजारांना सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना दिसून आल्या आहेत.

यापूर्वीच्या संशोधनात आढळले होते की कोरोना संसर्गानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत चेतासंस्था व मानसिक आरोग्याशी संबंधित आजार होण्याचा धोका अधिक असतो. आताच्या संशोधनात आढळले की कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या प्रौढांना अँक्झायटी व डिप्रेशनचा धोका अधिक असतो. मात्र, हा धोका संसर्गानंतर दोन महिन्यांनंतर कमी होतो. लहान मुलांमध्ये हा धोका तुलनेने कमी असतो.

Back to top button