प.बंगालमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर | पुढारी

प.बंगालमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर

कोलकाता : ए.सी. भक्तीवेदान्त स्वामी प्रभुपाद यांनी ‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ’ म्हणजेच ‘इस्कॉन’ची स्थापना करून जगभरात भक्तिमार्गाचा डंका वाजवला. त्यांनी आपल्या हयातीतच विविध देशांमध्ये अनेक सुंदर मंदिरांची उभारणी करून जगाला श्रीकृष्णभक्तीचे व गीता-भागवताचे ज्ञान दिले. या ‘हरे कृष्ण’ आंदोलनाचे मुख्यालय प. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थळ असलेल्या मायापूर येथे आहे. याठिकाणी भविष्यात एक भव्य मंदिर उभे राहील, असे नित्यानंद प्रभूंनी म्हटले होते. पाचशे वर्षांपूर्वी अवतरीत झालेल्या चैतन्य महाप्रभूंना श्रीकृष्णाचा व नित्यानंद प्रभूंना श्रीबलरामाचा अवतार मानले जाते. आज याच मायापुरात जगातील सर्वात मोठे मंदिर उभे राहिलेले आहे. तब्बल 700 एकर जागेतील या मंदिराच्या उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

प.बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर येथील या मंदिराचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता हे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याचे 2024 मध्ये उद्घाटन होऊ शकेल. या मंदिरातील सर्व काही भव्य-दिव्यच असून मंदिरासाठी जगभरातील भक्तांनी उदार देणग्या दिलेल्या आहेत. ‘फोर्ड’ कंपनीचे मालक आफ्रेड फोर्ड (अंबरीष दास) यांनी यासाठी पुढाकार घेतला व त्यांनी स्वतः 300 कोटी रुपयांची देणगी दिली. इस्कॉन मायापूरचे टीओव्हीपी सदस्य इष्ट देव यांनी सांगितले की पाचशे वर्षांपूर्वी नित्यानंद प्रभूंनी येथील अद्भुत मंदिराची भविष्यवाणी केली होती.

इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी 1971 मध्ये येथे तीन एकर जमीन खरेदी करून मंदिरासाठी 1972 मध्ये भूमिपूजन केले. भव्य मंदिराचे बांधकाम 2009 पासून सुरू झाले. सुरुवातीच्या बजेटनुसार मंदिर 600 कोटी रुपयांमध्ये बांधले जाणार होते. मात्र, कोरोना काळ व त्यानंतर वाढलेल्या खर्चामुळे ते एक हजार कोटींवर पोहोचले. या मंदिराचा पाया शंभर फूट म्हणजे जमिनीत दहा मजली इमारतीच्या बरोबरीने असून यावरूनच मंदिराच्या आकाराचा अंदाज लावता येऊ शकेल.

येथे वापरण्यात येणार्‍या टाईल्स राजस्थानमधून तसेच व्हिएतनाम, फ्रान्स, दक्षिण अमेरिकेतून आणलेल्या आहेत. मंदिराची उंची 380 फूट असून तिथे वैदिक तारांगण, प्रसादालय, गोशाळा, पुस्तकालय, वस्तुसंग्रहालय आदी अनेक उपक्रम पाहायला मिळतील. बांधकाम पूर्ण झाल्यावर याठिकाणी एकाच वेळी दहा हजार भक्तांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेता येणार आहे. याठिकाणी जगभरातून कृष्णभक्त येत असल्याने व भविष्यात येथील पर्यटनही वाढणार असल्याने राज्य सरकारने मायापूर येथील विमानतळाचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दिला आहे. एखाद्या मंदिरासाठी विमानतळ बांधण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.

Back to top button