पर्सिव्हरन्स गोळा करणार मंगळावरील मातीचे नमुने | पुढारी

पर्सिव्हरन्स गोळा करणार मंगळावरील मातीचे नमुने

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘पर्सिव्हरन्स रोवर’ हे अन्य रोवरपेक्षा अत्यंत वेगळे आहे. ‘पर्सिव्हरन्स’ला असे खास प्रयोग करण्यासाठी पाठवण्यात आले आहे की, जेे मानवी मंगळ मोहिमांना उपयोगी ठरतील. तसेच ‘पर्सिव्हरन्स’वर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आणि ती म्हणजे मंगळावरील मातीचे नमुने गोळा करणे. हेच नमुने पृथ्वीवर आणण्यात येतील.

मंगळावरील मातीचे नमुने गोळा करण्याचा पर्सिव्हरन्स रोवरचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला आहे. आता पुन्हा एकदा हाच प्रयत्न येत्या आठवड्यात करण्यात येणार आहे. ‘नासा’च्या पथकाकडून यासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे.

पर्सिव्हरन्स रोवरकडून मंगळावरील ‘रोशैट्टी’ नामक खडकाळ परिसरात खोदाई करण्यात येणार आहे. यासाठी ‘नासा’चे पथक प्रथम खोदाईचा भाग रोवरकडून स्वच्छ करवून घेईल. त्यानंतर तेथे खरोखरच खोदाई करणे शक्य आहे का? याचा अभ्यास करेल. त्यानंतरच खोदाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या पर्सिव्हरन्स हे रोवर जजिरो क्रेटर परिसरात कार्यरत आहे. तेेथील मातीत प्राचीन सूक्ष्म जीवनाचे संकेत मिळतात का? याचा शोध घेत आहे.

‘रोशैट्टी’ नामक टेकडी परिसरात पर्सिव्हरन्स रोवर प्रथम आपल्या सात फूट लांब रोबोटिक हाताने खोदाईचा भाग स्वच्छ करेल. त्यानंतर ‘नासा’चे पथक तेथे खोदाई करावयाची की नाही, याचा निर्णय घेईल. सर्व योग्य असले तर खोदाई होईल. या प्रयोगाकडे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे.

Back to top button