आर्क्टिक प्रदेशातील बर्फावर आणखी बारकाईने ठेवली जाणार नजर | पुढारी

आर्क्टिक प्रदेशातील बर्फावर आणखी बारकाईने ठेवली जाणार नजर

लंडन : जागतिक तापमानवाढीचे परिणाम आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही ध्रुवांवरही दिसून येत आहेत. आर्क्टिकमधील गोड्या पाण्याचे मोठे साठे असणारे बर्फ तापमानवाढीमुळे वेगाने वितळत आहे. जगभरातील संशोधक या बर्फाच्या साठ्याकडे लक्ष ठेवून आहेत.

आता या दिशेने ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे (बीएएस) आणि द अ‍ॅलन ट्यूरिंग इन्स्टिट्यूटच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने नवे पाऊल उचलले आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक खास टूल विकसित करण्यात यश मिळवले आहे. त्याच्या सहाय्याने आर्क्टिक प्रदेशातील बर्फावर आणखी बारकाईने लक्ष ठेवले जाऊ शकते.

संशोधकांनी या टूलला ‘आईसनेट’ असे नाव दिले आहे. ही प्रणाली विकसित करणार्‍या संशोधकांनी म्हटले आहे की वाढत्या तापमानामुळे गेल्या चार दशकांमध्ये आर्क्टिकचे सागरी बर्फाचे क्षेत्र निम्मेच उरले आहे. ग्रेट ब्रिटनच्या आकाराच्या सुमारे 25 पटीने मोठ्या आकारात हे नुकसान झालेले आहे. या बदलाचा परिणाम संपूर्ण जगभर पाहायला मिळेल. त्यामुळेच आम्ही एक सरस अशी पूर्वानुमान प्रणाली विकसित करू इच्छित होतो.

त्यामुळे अधिक अचूकतेने भावी परिवर्तनाचा अनुमान लावून योग्य पावले उचलता येऊ शकतील. आईसनेटच्या मदतीने आर्क्टिकचे बर्फ वितळण्याचा अचूक पूर्वानुमान एक सिझन आधीच लावता येऊ शकेल. ही प्रणाली 95 टक्के अचूक निष्कर्ष देते असे आढळून आले आहे. त्यामुळे योग्यवेळी योग्य पावले उचलनू बर्फ वितळून होणारे नुकसान कमी करता येऊ शकेल.

 

Back to top button