अन्य भागांपेक्षा आर्क्टिकची तापमानवाढ चौपट वेगाने | पुढारी

अन्य भागांपेक्षा आर्क्टिकची तापमानवाढ चौपट वेगाने

हेल्सिंकी ः जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक प्रभाव ध—ुवीय भागात दिसून येत आहे. उत्तर ध—ुव म्हणजेच आर्क्टिक प्रदेशात तर गेल्या 40 वर्षांमध्ये पृथ्वीच्या अन्य भागांपेक्षा चौपट वेगाने तापमानवाढ होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमधून ही चकीत करणारी माहिती समोर आली आहे.

जगातील गोड्या पाण्याचा सर्वाधिक साठा असलेल्या या बर्फाळ प्रदेशातील बर्फ वेगाने वितळून हा साठा वेगाने समुद्राच्या खार्‍या पाण्यात मिसळून जात आहे. त्यामुळे समुद्राच्या स्तरातही वाढ होण्याचा धोका वाढला आहे. नव्या संशोधनानुसार गेल्या चाळीस वर्षांच्या काळात पृथ्वीवरील अन्य कोणत्याही भागाच्या तुलनेत आर्क्टिकमधील तापमानवाढ चौपट वेगाने होत आहे. याचा अर्थ सध्याचे क्लायमेट मॉडेल हे पोलर हिटिंग म्हणजेच ध—ुवीय प्रदेशातील तापमानवाढीच्या दराला कमी नोंदवत होते. संयुक्त राष्ट्रांच्या क्लायमेट सायन्स पॅनेलने 2019 मध्ये एका विशेष रिपोर्टमध्ये म्हटले होते की आर्क्टिक अ‍ॅम्प्लिफिकेशनच्या रूपात ओळखल्या जाणार्‍या प्रक्रियेच्या कारणामुळे आर्क्टिक वैश्विक सरासरीच्या तुलनेत दुप्पटीने अधिक उष्ण होत आहे. हे त्यावेळी होते ज्यावेळी सूर्यकिरणे परावर्तित करणारे सागरी बर्फ उष्णतेला शोषून घेऊन समुद्रात वितळून जाते. नॉर्वे आणि फिनलँडमधील संशोधकांच्या एका टीमने 1979 पासूनच्या सॅटेलाईटस्पासून गोळा केलेल्या तापमान डेटानुसार आर्क्टिक 0.75 अंश सेल्सिअस प्रतिदशक या वेगाने उष्ण होत आहे. हे प्रमाण पृथ्वीच्या अन्य भागांच्या तुलनेत चौपटीने अधिक आहे. यापूर्वी असे अनुमान लावले जात होते की आर्क्टिक प्रदेश अन्य भागांपेक्षा दुप्पट वेगाने उष्ण होत आहे.

Back to top button