माया संस्कृतीत होते रबरी बॉल | पुढारी

माया संस्कृतीत होते रबरी बॉल

न्यूयॉर्क ः माया संस्कृतीमधील लोक त्यांच्या राजांच्या मृतदेहाचे दहन करीत असत व त्यांच्या राखेचा वापर चेंडूच्या खेळासाठी रबराचा चेंडू बनवण्यात करीत. दक्षिण मेक्सिकोमधील माया संस्कृतीमधील टोनिना नावाच्या शहरात करण्यात आलेल्या उत्खननात याबाबतचे पुरावे सापडल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी चेंडूच्या या खेळाला ‘बॉलगेम’ असे नाव दिले आहे. अर्थात या संस्कृतीच्या काळातील नाव वेगळेच असणार हे उघडच आहे. इंग्रजीतील कॅपिटल ‘आय’ आकाराच्या मैदानात खेळाडूंच्या दोन संघांकडून असा रबरी बॉलचा खेळ खेळला जात असे. हा खेळ अमेरिका खंडात प्राचीन काळी हजारो वर्षे लोकप्रिय होता. टोनिनासह माया संस्कृतीमधील अनेक प्राचीन शहरांमधील उत्खननात अशी मैदाने आढळून आली आहेत. आता या खेळातील रबरी चेंडूंबाबतचा सिद्धांत मेक्सिकोच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अँथ—ोपोलॉजी अँड हिस्टरी येथील याडून अँग्युलो यांनी मांडला आहे. त्यांच्या टीमने टोनिनामधील ‘टेम्पल ऑफ द सन’ (सूर्यमंदिर) या नावाच्या एका पिरॅमिडखाली 1300 वर्षांपूर्वीची काही सामग्री शोधून काढली. त्यामध्ये राख, कोळसा आणि नैसर्गिक रबरासारखे काही जैविक घटक होते. तेथील सुरयांमधील राखेचा अभ्यास केल्यावर ही राख तेथील सत्ताधीशांच्या दहनानंतरही राख असावी असे दिसून आले. भांड्यांमधील अन्य सामग्री ही ‘व्हल्कनायझेशन’च्या प्रक्रियेसाठी गरजेची होती. पिरॅमिडजवळील प्राचीन मैदानातील काही शिल्पकृतींवरील कोरीव सामग्रीवरून असे दिसून आले की त्यावर वाक चान काहक नावाच्या शासकाचे नाव आहे. त्याचा मृत्यू इसवी सनाच्या 1 सप्टेंबर 775 मध्ये झाला होता. तसेच कावील कान नावाची एक उच्चपदस्थ महिला इसवी सन 722 मध्ये मृत्युमुखी पडली होती. या दोघांच्या दहनानंतरची राख या मैदानात वापरण्यात येणार्‍या रबरी चेंडूत होती.

Back to top button